मुख्याध्यापकांनी तंत्रस्नेही व्हावे
By admin | Published: January 25, 2017 12:41 AM2017-01-25T00:41:43+5:302017-01-25T00:41:43+5:30
शाळा महाविद्यालयातील सर्वच कामे संगणकाचा वापर करुन होत आहे. ज्ञानदानाचे कार्य सुध्दा ई-लर्निंगद्वारे होत आहे.
भाऊसाहेब थोरात : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा आढावा बैठक
पवनी : शाळा महाविद्यालयातील सर्वच कामे संगणकाचा वापर करुन होत आहे. ज्ञानदानाचे कार्य सुध्दा ई-लर्निंगद्वारे होत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तकांची मागणी, शालेय पोषण आहार व दैनंदिन हजेरी अशी सर्व कामे आॅनलाईन पध्दतीने केली जात आहे. या सर्व कामांसाठी मुख्याध्यापकांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वत: तंत्रस्नेही व्हावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्य) भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती सभागृहात आयोजित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे धोरण आता प्राथमिक पुरते मर्यादित राहिले नाही. माध्यमिक शाळांनी देखील त्यांची काटेकोरपणे अमलबजावणी करुन प्रक्रिया अहवाल दर महिन्याला सादर करावा. विद्यार्थी व शालेय गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावा. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरवितांना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, शालेय पोषण आहार अधीक्षक रवि सलामे, विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, शिक्षण विभागातील अन्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. आभार गटशिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)