तलाव वाॅर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:12+5:302021-09-02T05:15:12+5:30

प्रकरण मोबाईल मनोरा बांधकामाचे : सेटिंगसमोर सर्व काही आलबेल भंडारा : साकोली शहरातील तलाव वाॅर्डात पुंडलिक कवाशे यांच्या निवासस्थानी ...

The health of the citizens of the lake ward is in danger | तलाव वाॅर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तलाव वाॅर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

प्रकरण मोबाईल मनोरा बांधकामाचे : सेटिंगसमोर सर्व काही आलबेल

भंडारा : साकोली शहरातील तलाव वाॅर्डात पुंडलिक कवाशे यांच्या निवासस्थानी निर्माणाधीन मोबाईल मनोऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. मोबाईल मनोऱ्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मानवी आरोग्याला धोका आहेच, याशिवाय पशुपक्षी व जलचरांचीही मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे.

या संपूर्ण प्रकरणी साकोली नगर परिषद प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून, कुणीही आता बोलायला तयार नाही.

प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या साकोली शहरातील तलाव वाॅर्डात कवाशे यांच्या निवासस्थानी असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल मनोरा बांधकाम गत दोन महिन्यांपासून सुरू आहे. मनोऱ्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विशेष म्हणजे या मनोरा बांधकामासाठी तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी परवानगी दिली होती. मात्र, कुठल्याही प्रकारचा ठराव नगर परिषदेत पारीत करण्यात आला नव्हता. येथील नागरिकांनीही यासंबंधी निवेदन देत मोबाईल मनोऱ्याचे बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली होती.

नगर परिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक याबाबत काहीच बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रभारी मुख्याधिकारी सौरव कावळे यांनीही याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाही. नागरिकांची तक्रार असूनही तसेच याबाबत पालिकेत कुठलाही ठराव नसतानाही परवानगी मिळतेच कशी, असा गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहे. सर्व यंत्रणा ‘सेट’ झाल्याने कोणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही.

बॉक्स

मानवी जीव कवडीमोल!

मोबाईल मनोरा कार्यान्वित होताच शंभर ते दोनशे मीटर परिसरापर्यंत मनोऱ्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा फटका सर्वांनाच बसणार आहे. मानवी जीवासह पशुपक्षी व जलचर यांनाही धोका उत्पन्न होणार आहे. मोबाईल मनोऱ्याच्या पूर्व दिशेला मोठा विस्तीर्ण गाव तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात जलचर आहेत. या जलचरांना रेडिएशनचा फटका बसू शकतो. याशिवाय वॉर्डातील रहिवाशांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याने पैशांसमोर मानवी जीव कवडीमोल ठरल्याचे हे उत्तम उदाहरण म्हटले तर नवल ठरू नये.

Web Title: The health of the citizens of the lake ward is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.