अद्ययावत सुविधांसह आरोग्य विभाग सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:17+5:302021-05-26T04:35:17+5:30
लाखनी : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला होता. गावखेड्यातून मोठ्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेक गोरगरीब प्राणास मुकले. कोरोनाच्या ...
लाखनी : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला होता. गावखेड्यातून मोठ्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेक गोरगरीब प्राणास मुकले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अख्खा तालुका प्रभावित झाला. ग्रामीण भागात आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने तारेवरची कसरत करून दुसऱ्या लाटेची रुग्णसंख्या कमी करण्यास यश मिळविले आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून, लाखनी तालुका आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.
दुसऱ्या लाटेची विदारक परिस्थिती बघता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सुसज्ज झालेला आहे. तालुक्यात मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाने करडी नजर ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात पहिल्या लाटेत १९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर १ हजार ३२६ कोरोना रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या लाटेत कोरोनाने महाभयंकर रूप धारण केले. जानेवारीपासून कोरोनाचा दाहक अनुभव लाखनी तालुक्यातील जनतेने घेतला. तालुक्यात दुसऱ्या लाटेत ७७ व्यक्तींचा मृत्यू झाला. कोरोनाची रुग्णसंख्या ५ हजार ११५ वर पाेहोचली. अद्ययावत कोरोना केअर सेंटर नसल्यामुळे व ऑक्सिजनची कीट उपलब्ध झालेली नसल्याने प्राणास मुकावे लागले. खासगी रुग्णालयांतील सुविधा अपुऱ्या ठरल्या आहेत. पैसा खर्च करूनही प्राण वाचविता आले नाही.
बॉक्स
केसलवाडा येथे अद्ययावत कोरोना केअर सेंटर
लाखनी तालुक्यात अपुऱ्या सुविधेमुळे भंडारा व नागपूर येथे रुग्णांना दाखल केले जात होते. तालुक्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासनाने केसलवाडा (वाघ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० बेडचे ऑक्सिजन प्लांट उपलब्ध असलेले रुग्णालय उभे करण्यात येत आहे. तालुक्यात आरोग्य विभागाचे ६० बेडची व्यवस्था असलेले कोरोना केअर सेंटर समर्थ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता महिला वसतिगृहात सुरू आहे. त्यात ६० ऑक्सिजन सिलिंडर आहेत, तर १९ ऑक्सिजन फ्लो मीटर उपलब्ध आहेत. तालुक्यात डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे यांच्या २० बेड उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. केसलवाडा (वाघ) येथे लहान मुलांच्या वाॅर्डची व्यवस्था केली जाणार आहे.
बॉक्स
लाखनी तालुका लसीकरणात अव्वल
जिल्ह्यात लाखनी तालुका लसीकरणात अग्रस्थानी आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या २६ हजार २०९ आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ९७३६ आहे. असे एकूण ३५ हजार ९४५ डोस देण्यात आले आहेत. तालुक्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील, ४५ ते ५९ वर्षे वयोगट, ६० वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील १४२८ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपैकी १२ हजार ६९४ व्यक्तींनी पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस ५ हजार ८८६ व्यक्तींनी घेतला आहे. तालुक्यात केसलवाडा (वाघ), मुरमाडी (तुपकर), पिंपळगाव (सडक), पोहरा, सालेभाटा, ग्रामीण रुग्णालय लाखनी व पालांदूर येथील आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण करण्यात येत आहे.
बॉक्स
ऑक्सिजन प्लांटची तयारी
लाखनी तालुक्यातील रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या पुढाकाराने केसलवाडा (वाघ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोट
जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सुसज्ज केली आहे. तालुक्यात ऑक्सिजन प्लांट व नवीन अद्ययावत १०० बेडचे रुग्णालय केसलवाडा (वाघ) येथे सुरू करण्यात येत आहे. लहान मुलांसाठी व्यवस्था केलेली आहे.
डॉ. सुनील हटनागर, तालुका आरोग्य अधिकारी