सिहोरा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी उद्धटपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:04+5:302021-06-16T04:47:04+5:30
रंजित चिंचखेडे चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे रुग्ण ...
रंजित चिंचखेडे
चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. यामुळे ओपीडीत रुग्णाच्या संख्येत कमालीची घट झाली असून, खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण धाव घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खुणे यांच्या स्वभाव गुणांची चर्चा परिसरात होत आहे. यात आता परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी भर घातली आहे. राजकीय पाठबळ असल्यानेच वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचा मुजोर कारभार सुरू झाल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे.
सिहोरा गावात परिसरातील ४७ गावांतील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. सुसज्ज इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना लागणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध केल्या आहेत. परंतु यासुविधापासून रुग्ण मात्र उपेक्षित आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खुणे असभ्य वर्तवणूक करीत असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. ओपीडीत जातांना रुग्ण आधी वैद्यकीय अधिकारी कार्यरत कोण आहेत, याची खातरजमा करीत आहेत. डॉ. खुणे कार्यरत असल्याचे दिसताच रुग्ण पळ काढत आहेत. तपासणीकरिता रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कक्षात जाताच त्यांचे सोबत उर्मट व असभ्यपणे बोलतात. यापूर्वी रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉ. खुणे यांच्यासोबत भांडण केले होते. तरीही त्यांच्यात बदल झालेला नाही. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला आधीच भीती दाखविण्यात येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचे उर्मट वागणुकीमुळे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांविरोधात रुग्ण तक्रारी करीत असतानाही राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांचे स्थानांतरण करण्यात आलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी खुणे येथे कार्यरत आहेत. आरोग्य विभाग कार्यरत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर मेहेरबान असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. रुग्णालयात परिचारिकांना माहिती विचारली असता रुग्णांना सांगितले जात नाही. त्यांना उलटसुलट उत्तरे दिली जातात. यामुळे अशिक्षित व ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक वेळेस त्यांना परतवून लावले जाते. परिचारिका रुग्णांना योग्य सल्ला देत नाहीत, वर मुजोरीही वाढली आहे. यामुळे तक्रार करायची तर कुणाला? असा सवाल रुग्ण करीत आहेत. विचारणा करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांसोबतही वैद्यकीय अधिकारी व परिचारिका असभ्यपणे वागत आहेत. विचारपूस केली असता माहिती देत नाहीत.
बॉक्स
वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना राजकीय पाठबळ कुणाचे
सिहोरा गावांत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळेच परिचारिका मुजोर झाल्या आहेत. यामुळे रुग्ण व सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या रुग्णालयात चौकीदार नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय उपचाराचे केंद्र नसून कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुजोर कारभाराचे ठिकाण बनले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. खुणे यांना संपर्क साधला असता ते कधीच प्रतिसाद देत नाहीत. अरेरावी करत असल्याने विविध योजनेचे पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. वैद्यकीय अधिकारी व वादग्रस्त परिचारिकांना तत्काळ हटविण्याची मागणी रुग्ण व त्यांचे नातेवाइकांनी केली आहे.
बॉक्स
रुग्णांना दिला जातो रेफरचा सल्ला
सिहोरा परिसरातील गावे नदीकाठ व जंगल व्याप्त भागातील आहेत. तुमसर तालुका २२ किमी अंतरावर आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी सिहोरा गावांत ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. या रुग्णालयात फक्त तापाच्या गोळ्या देण्यात येत आहेत. परंतु रात्री कुणी रुग्ण गेल्यास तपासणी न करताच नेहमीच अधिकारी, कर्मचारी रेफरचा सल्ला देत कामास टाळाटाळ करतात. गरीब रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न रुग्ण विचारत आहेत.