आरोग्य कर्मचारी वसाहत वाळवीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:00 AM2017-09-01T00:00:17+5:302017-09-01T00:00:28+5:30
आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडली असून वाळवीच्या भक्षस्थानी पडू लागली आहे.
इमारतीच्या बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेला असून शासनाच्या तिजोरीवर अकारण भुर्दंड पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या लाखांदूर या तालुकास्थळी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कालांतराने या रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊन दर्जाही वाढविण्यात आला होता. लाखांदूर पासून काही अंतरावर तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाºयांच्या निवासाची गंभीर समस्या लक्षात घेऊन ही बहुमजली इमारत शासनाने तयार करून दिली. मात्र तिथे एकही कर्मचारी राहत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे येथील सर्व महागड्या साहित्यांची चोरी झाली आहे. येथील कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून काही बाहेरगाववरून येणे जाणे करतात.
ही इमारत अंतरगावच्या हद्दीत असून लाखांदूरपासून ३ किमी अंतरावर आहे. इमारत गावाबाहेर असल्याने कर्मचारी या इमारतीत वास्तव्य करण्यास तयार नाही. या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, दारे व खिडक्या चोरांनी लांबविल्या आहेत.
आजघडीला गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि इकडे कोट्यवधी रुपयांची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्रशासनाने एखाद्या गरीब कुटुंबाला आश्रय दिला तर वावगे ठरणार नाही मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १६ वर्षांपुर्वी तयार झालेल्या इमारतीला भग्नावस्था आली असून असामाजिक तत्व आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या इमारतीच्या उभारणीवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसून येते. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन या इमारतीत गरिबांना तरी आश्रय देऊ करावे व इमारतीत जे कर्मचारी राहव्यास तयार नाही त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनता करू लागली आहे .