महामार्गावरील मुरूमाचे ढिगारे अपघातास आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:02+5:30
तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ढिगारे पडून आहे. वाहनांमुळे हा मुरूम रस्त्यावर येत आहे. ढिगाऱ्यातील मुरूम निट पसरविण्याचे सौजन्यही संबंधित कंत्राटदाराला दाखविता आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ता सुरक्षीत असावा, असा नियम आहे. परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी (दे.) शिवारात रस्त्याजवळ मुरूमाचे ढिगारे पडून आहे. रस्त्यावर भरावाकरिता पाखण मातीचा वापर करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा रस्ता निसरडा तर उर्वरितवेळी धुळीचे लोट वाहतात. या प्रकाराने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ढिगारे पडून आहे. वाहनांमुळे हा मुरूम रस्त्यावर येत आहे. ढिगाऱ्यातील मुरूम निट पसरविण्याचे सौजन्यही संबंधित कंत्राटदाराला दाखविता आले नाही.
काही ठिकाणी रस्ता भरावात पाखण मातीचा वापर करण्यात आला आहे. पाऊस पडल्यानंतर रस्ता निसरडा होता. तर इतर वेळी धुळीचे लोट उडतात. त्यामुळे दृश्यमानता कमी होते. समोरील वाहने दिसत नाही. अपघाताची शक्यता बळावली आहे. येथून जाताना वाहन धारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतील रस्ता अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर येते.
जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी या रस्त्याच्या बांधकामाबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, माडगी शिवारातून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता आहे. वारंवार तक्रारी करूनही याकडे प्राधीकरणाला लक्ष देण्याची सवड नाही. त्यामुळे आता आत्मी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्याची ही अवस्था गत काही दिवसांपासून असून माडगी परिसरातील नागरिकच नव्हे तर रस्त्यावरून जाणारे वाहन धारकही त्रस्त झाले आहे. दुचाकी चालकांना तर येथून वाट कशी काढावी, असा प्रश्न पडतो. परंतु कुणी याकडे लक्ष देत नाही.
प्राधीकरणाचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर महामार्ग प्राधीकरणचे नियंत्रण आणि देखरेख आहे. परंतु त्यांचेही येथे दुर्लक्ष होत आहे. अपघाताची प्रतीक्षा तर महामार्ग प्राधीकरण करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गत वर्षभरापासून येथे संथगतीने काम सुरू आहे. लोकप्रतीनिधीही याकडे दुर्लक्ष करीत आहे. धुळीमुळे नागरिकांना डोळ्याचे आजार बळावले आहे.