पूर्व विदर्भात येणार उष्णतेची तीव्र लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:56 PM2019-04-22T15:56:13+5:302019-04-22T15:57:48+5:30
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून २६ ते २३ एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून २६ ते २३ एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने चाळीशी पार केली असून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याचे संकेत आहे.
अरबीसागर ते बंगालची खाडीपर्यंत गत १० दिवसात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होवून पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होवून वाऱ्याची गती संत झाली आहे. वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होवून तापमान वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात २३ ते २६ एप्रिल दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहीत होणार आहे. परिणामी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंशाच्या आसपास आहे. या उष्णतेच्या लाटेने त्यात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ४२ ते ४३ अंश सेल्सियस तापमान होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील उन्हाळा तसा प्रसिद्ध आहे. एप्रिल, मे महिन्यात तापमान प्रचंड वाढलेले असते. सूर्य आग ओकत असल्याने रस्ते भट्टीसारखे तापतात. या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होवून आरोग्याची समस्या निर्माण होते. आगामी तीन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा.