जिल्ह्यात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:24 AM2017-08-30T00:24:27+5:302017-08-30T00:24:57+5:30

उशिरा का असेना वरुण राजाची कृपा भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे.

Heavy rain in the district; Baliharaja has dried up | जिल्ह्यात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला

जिल्ह्यात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला

googlenewsNext
ठळक मुद्देचार तालुक्यात अतिवृष्टी : सरासरी ६९ मि.मी. पावसाची नोंद, खोळंबलेल्या रोवणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उशिरा का असेना वरुण राजाची कृपा भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६९.३ मि.मी. पाऊस बरसला असून चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यात लाखनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला होता. दरम्यान दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने जिल्ह्यात दमदार एन्ट्री मारली. यात भंडारा तालुक्यात ४० मि.मी., मोहाडी ९२.४, तुमसर ७७.४, पवनी २७.२, साकोली ६२.८, लाखांदूर ९३.६, लाखनी तालुक्यात ९१.८ मि.मी. पाऊस बरसला.
पावसाची कधी दीर्घ तर कधी कमी दिवसांच्या विश्रांतीमुळे धान रोवणीला खोळंबा होत होता. २५ आॅगस्ट पर्यंत जिल्ह्यात जवळपास फक्त ६० टक्के रोवणी झाली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसांमुळे खोळंबलेल्या रोवणीला जोमात प्रारंभ झाला आहे. असे असले तरी पाऊस उशिरा बरसल्याने धान उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत पोषक वातावरणामुळेही धान पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
पालांदूर परिसरातील धानपिक गर्भावस्थेत येत असल्याने अशा रिमझीम पावसाचा लाभ पिकाला होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाचा आधार राहू शकतो. दरवर्षीच्या तुलनेत काही ठिकाणी खोडकिडी व साधा करपाची लागण झाली असून फवारणी सुरु करण्यात आली आहे.
नदी काठावरील गावांना सतर्कतेची सूचना
पवनी : गोसेखुर्द धरणातील वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन सायंकाळी ५.२० वाजता या धरणाचे एकूण ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढलेला असून नदीकाठावरील गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला असून सतर्कता बाळगण्याची अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. धरणातील पाण्याची पातळी २४२ मीटर ईतकी असून ३०२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत ६०६.७० मि.मी. पाऊस झालेला असल्याने धरणातील जलसाठा वाढला आहे.
संततधार पावसामुळे घर कोसळले
सासरा : सासरा येथे गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसाने येथील मोहन खर्डेकर यांचे राहते घर कोसळले. यात कोणत्याही प्रकारची प्राणहानी झालेली नाही. सदर कोसळलेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी पोलीस पाटील माणिक धांडे, ग्रामपंचायत सदस्य, शालीक खर्डेकर व अन्य पदाधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पडलेल्या प्रकाराची माहिती तलाठी खोब्रागडे यांना कळविली. घर कोसळण्याचा प्रकार संततधार पावसाने घडला असून यात मोहन खर्डेकर यांचे दोन लाखांचे जवळपास नुकसान झाले आहे. कोसळलेले घर मातीच्या भिंतीचे असून कौलारू छपराचे होते. घराला लागून गुरांचा गोठा होता. तोही या पावसाच्या फटक्याने कोसळला. घराचे छप्पर व भिंतीही कोसळल्या आहेत. सदर घर एका शेतकºयाचे आहे.

Web Title: Heavy rain in the district; Baliharaja has dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.