भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गाेसेचे २५ दरवाजे उघडले, अनेक घरांत शिरले पाणी
By ज्ञानेश्वर मुंदे | Published: September 12, 2022 01:36 PM2022-09-12T13:36:01+5:302022-09-12T13:36:42+5:30
हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
भंडारा : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराने आठ मार्ग बंद झाले आहे. भंडारा शहरातील अनेक घरात पाणी शिरले असून गोसे प्रकल्पाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ग्रामीण भागात काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सोमवारी पहाटे ४.३० वाजतापासून जिल्ह्यात धुव्वधार पावसाला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. पवनी तालुक्यातील सोमनाळा-कोंढा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग सकाळपासून बंद आहे. या सोबतच विरली ते सोनेगाव, अड्याळ ते सोनगाव, अड्याळ ते दिघोरी, लाखांदूर ते पिंपळगाव, पाऊलदौना ते बेलची, पाऊलदौना ते तई, लाखांदूर ते अर्जुनी मोरगाव हे मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ, कोंढा, चिचाळ, आसगाव, साकोली तालुक्यातील एकोडी, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर, बारव्हा, मासळ आणि लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. लाखनी तालुक्यातील लावडी येथील तेजराम गभने यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. भंडारा शरातील म्हाडा कॉलनी, भोजापूर परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले आहे.
गोसे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असल्याने २५ दरवाजे सोमवारी दुपारी १ वाजता उघडण्यात आले असून ३००७.५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरण पाणीपातळी नियंत्रणासाठी पुढील काही तासत ४५०० ते ५००० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने सांगितले.