भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी; सखल घरांमध्ये शिरलं पाणी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: July 20, 2024 10:19 AM2024-07-20T10:19:33+5:302024-07-20T10:19:53+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर, आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गा मध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे.
भंडारा - जिल्ह्यात रात्रभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक मार्ग बंद पडले असून पावसाचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वैनगंगेची पातळी वाढली आहे. तसेच नदी व नाल्यांना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे नदीचे पाणी, धरणातील विसर्ग व तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे.
सदर ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह करू नये.
आपल्या जीवितास त्याच बरोबर सोबतच्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करू नये, असे नम्र आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा च्या वतीने करण्यात येत आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3500 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गा मध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे.
घरांमध्ये पाणी
भंडारा शहरातील खोलगट वस्तीसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. लाखांदूर, पालांदूर यासह अन्य भागातून या तक्रारी येत आहेत. रस्ते उंच व घरे कोलगेट भागात गेल्याने ही समस्या अनेक ठिकाणी उद्भवली आहे. यामुळे मध्यरात्री अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. अनेकांचे प्रचंड नुकसान झाले.
मार्ग बंद
भंडारा शहरातून कारधा येथील साई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच फूट पाणी साचल्याने मार्ग बंद पडला आहे. पवनी तालुक्यातील आसगांव ते ढोलसर हा मार्गही बंद पडला आहे. तसेच लाखांदूर ते पिंपळगाव ( कोहळी ) मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग सुद्धा बंद आहे.
शाळांना सुट्टी जाहीर
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.