साकोली, तुमसर तालुक्यात अतिवृष्टी
By admin | Published: July 9, 2016 12:27 AM2016-07-09T00:27:46+5:302016-07-09T00:27:46+5:30
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तुमसर, साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली.
गोसेखुर्दचे २५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले : संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित, रोवणीला वेग, बळीराजा शेतीकामात व्यस्त
भंडारा : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तुमसर, साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५२.९ मि.मी पाऊस बरसला. गोसीखुर्द धरणाची ३३ पैकी २५ वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहे. पावसाच्या दमदार आगमनाने बळीराजा सुखावला असून खरीपाच्या हंगामाला जोमात सुरूवात केली आहे. पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले.
भंडारा : दमदार पावसामुळे नगरपालिका प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. नाल्यात कचरा तुंबला असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत होते. शहरात रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. दरम्यान सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत संततधार पाऊस बरसला. मध्यतंरी काही वेळ पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी घराबाहेरची कामे आटोपून घेतली.
लाखांदुरात दमदार पाऊस
लाखांदूर : तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेती हंगामाला अनुकुल परिस्थिती जुळून आली आहे. पावसाला जोर नसल्यामुळे रोवणी खोळंबली आहे. कालपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत ७ जुलैपर्यंत कमी पाऊस झाला. धानाची रोपे लहान असल्यामुळे रोवणी रोवणी होणार की नाहील या विचाराने बळीराजा चिंतेत होता. तालुका कृषी विभाग व पंचायत समीती कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. अनुदानावर बियाणे दिले. कृषी साहित्य व कृषी अवजारे वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. मात्र पाऊस न बरसल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. पावसाळ्यात नदी, नाले कोरडे होते. हलक्या पावसाने पऱ्हे जिवत होते. मात्र पाणी जमिनीत न मुरल्यामुळे रोवणी लांबण्याची भिती सतावत होती. अखेर वरूणराजा प्रसन्न झाला. रात्रीपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. काल रात्री ३२.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळपासून संततधार सुरू आहे. .
लाखनीत ५७ मिमी पाऊस
लाखनी : ७ जुलैपासून संततधार पाऊस आहे. काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. तालुक्यात लाखनी प्रभागात ६१.४ मिमी, पिंपळगाव (सडक) ४९.२ मिमी, पोहरा ६१.२ मिमी, पालांदूर ६०.२ मिमी पावसाची नोंद आज सकाळी ८ वाजेपर्यंत करण्यात आली. तालुक्यात परसोडी येथील केवळ मांढरे यांचा जनावरांचा गोठा पावसामुळे पडलेला आहे. पोहरा येथील शत्रुघ्न अंबादे यांचे घराचे छप्पर पावसामुळे कोसळले आहे. पावसामुळे धान रोवणीला प्रारंभ झाला आहे.
शेतकरी सुखावला
मासळ : मासळ व परिसरात यावर्षीच्या सुरुवातीच्या विलंबानंतर काल गुरुवारपासून संततधार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पंपधारक शेतकऱ्यांनी मात्र मृग नक्षत्रातच पेरणी केली होती. त्यामुळे हा पाऊस त्यांच्याकरिता संजिवनी ठरला आहे. सध्या ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. २० टक्के रोवणी आटोपलेली आहे. वरथेंबी जमीन धारकाचे पऱ्हे अजून रोवणी योग्य झाले नाही. रोवणीला उशिर होवू शकतो.
साकोलीतही संततधार
साकोली : दोन दिवसापासुन साकोली तालुक्यात पावसाची झळ सुर ुअसून या पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी जनजीवन मात्र अस्तव्यस्त झाले. गुरुवारपासून साकोली तालुक्यात पावसाची झळ आहे या पावसाचा फायदा नक्कीच शेतीसाठी झाला आहे. शेतकऱ्यांनी रोवणीला सुरवात केली असून काही प्रमाणात रोवणी आटोपली आहे. मात्र या संततधार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून या पावसाचा परिणाम व्यापाऱ्यावर व शाळेवर होत आहे. पंचशिल वॉर्डातील दुर्गामंदिर ते गडकुंभली रोडपर्यंत नाल्याची सफाई न झाल्यामुळे व नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरुन वाहत आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धान रोवणी सुरु
कुंभली : कुंभली व परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरु असून शुक्रवारला मात्र पावसाने दमदार हजेरी लावली असून बळीराजा जोमाने कामात लागला आहे. यापूर्वी उशिरा झालेल्या पेरण्यांना सुध्दा संजिवनी मिळाली आहे. दुबार पेरणीचे संकट समोर उभे असतांना अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिता मिटली आहे. पूर्वी झालेल्या पेरणीचे रोवण करण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु पावसाने दमदार आगमन झाल्यामुळे रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला आहे. रोवणीचे चित्र पहावयास मिळत आहे. बळीराजा रोवणीच्या कामात व्यस्त असला तरी वाढलेल्या मजुरीमुळे व मजुरांच्या टंचाईमुळे त्रस्त आहे. ट्रॅक्टरमुळे चिखलणी करणे व महागाचे बियाणे व मजुरी यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोझा सुध्दा पडत आहे. तरीसुध्दा पावसाच्या दमदार हजेरीमुळे बाकी गोष्टी विसरुन बळीराजा रोवणीच्या कामात व्यस्त आहे.
धरणीमाता झाली तुप्त
पालांदूर : गुरुवारी रात्री ११ वाजतापासून जलधारा बरसल्या व धरतीमातेची तृष्णा भागविली. या पावसाने रोवणीला बेधडक आरंभ झाला आहे. पालांदूर सकाळी ७ वाजेपर्यंत ६०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पालांदूर मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे व मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके यांच्या सर्वेनुसार पेरणी १०० टक्के आटोपली असून या पावसाने रोवणीही पूर्णत्वाकडे जाऊ शकते. १२१०.४५ हेक्टर अंतर्गत पालांदूर कृषी मंडळात रोवणी ७९३२, आवत्या १३८६ हेक्टरमध्ये असुन तुळ, हळद, ऊस, भाजीपाला उर्वरित क्षेत्रात आटोपली आहे. परिसरात मजुरांची टंचाई भासत आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)