धो...धो बरसला; दोन तासात १०० मिमी पावसाची नोंद

By युवराज गोमास | Published: September 22, 2023 03:27 PM2023-09-22T15:27:12+5:302023-09-22T15:27:34+5:30

धान पिकांचे नुकसान : शेतशिवार जलमय, घरादारात शिरले पाणी

heavy rainfall in bhandara district; 100 mm of rain recorded in two hours | धो...धो बरसला; दोन तासात १०० मिमी पावसाची नोंद

धो...धो बरसला; दोन तासात १०० मिमी पावसाची नोंद

googlenewsNext

भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारला सकाळी १०:०० वाजतापासून १२.०० वाजतापर्यंत धो...धो पाऊस बरसला. दोन तासात १०० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे शेतशिवार जलमय झाले. घरादारात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. कौलारू घरांचे नुकसान झाले. अनेकठिकाणी घरे व गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. लोंबीवर असलेले हलके धान अतिवृष्टीने जमिनीवर लोळले. तर भारी धान पिकाचा फुलोरा झडल्याने उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पाऊस केव्हा थांबणार, याचीच चिंता शेतकऱ्यांत आहे.

जिल्ह्यात दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील ४ मध्यंम, ३१ लघु प्रकल्प, २८ मामा तलाव प्रकल्पांच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. आधीच तुडूंब भरलेली मामा तलाव, लघु प्रकल्प व मध्यंम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी ११०४.३ मिलिमीटर आहे. तर सध्यास्थितीत १०६० मिलिमिटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. पडलेल्या पावसाची टक्केवारी ९६ इतकी आहे. आणखी काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यास खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याचा अंदाज आहे. तर सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. 

गत आठवड्यात धरण व कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने पीके नेस्तनाबूत झाली होती. त्या त्रासदीत सध्या होत असलेल्या मुसळधार पाऊसाने आणखी भर पडली आहे. वरूण राजाला आता तरी थांब, अशी विनवणी शेतकरी करतांना दिसून येत आहेत.

तालुकानिहाय पडलेला पाऊस व टक्केवारी

तालुका - पडलेला पाऊस - टक्केवारी
भंडारा - १०४२.२ - ९४.९
मोहाडी - ९४३.० - ९४
तुमसर - ९२९.१ - ९०.४
पवनी - ११७६.१ - १०९९
साकोली - १०२६.२ - ८५,९
लाखांदूर - १३८८.४ - १३४.१
लाखनी - ९३९.८ - ९१.५
एकूण जिल्हा - १०६०.३ - ९६.०

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांची स्थिती

टक्केवारी - मध्यम लघु प्रकल्प - मामा तलाव - एकूण
० ते २५ - ०० - ०० - ०० - ००
२५ ते ५० - ०० - ०५ - ०४ - ०९
५० ते ७५ - ०१ - ०६ - ०७ - १४
७५ ते ९९ - ०० - ०९ - ०७ - १६
१०० - ०३ - ११ - १० - २४
एकूण ०४ ३१ २८ ६३

वैनगंगा दीड मिटरने खाली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असला तरी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलेली नाही. वैनगंगा धोक्याच्या इशाऱ्यापासून दीड मीटरने खाली आहे. कारधा येथील वैनगंगेची धोका पातळी २४५ मीटर असून सध्या नदीची पातळी २४३.५७ मीटर इतकी आहे. सध्या गोसे धरणात उपयुक्त जलसाठा ३६६.९३ दशलक्ष घनमीटर असून टक्केवारी ४९.५७ इतकी आहे. बावनथडी धरणातील उपयुक्त जलसाठा २२६.३१ दशलक्ष घनमीटर असून टक्केवारी ८८.८५ आहे.

गोसेचे गेट उघडले अर्धा मीटरने

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच धापेवाडा धरणाचे सर्व गेट खुले आहेत. गोसे धरणाचे १५ गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. १८३७.१७ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बावणथडी धरणाचे सर्व गेट बंद आहेत.

Web Title: heavy rainfall in bhandara district; 100 mm of rain recorded in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.