भंडारा जिल्ह्यात संततधार; दहा वर्षीय मुलगा नाल्याच्या पुरात गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 12:51 PM2022-07-18T12:51:47+5:302022-07-18T12:53:45+5:30
वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
इंद्रपाल कटकवार
भंडारा : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असून सोमवारी सकाळी नाल्यातील पुराच्या पाण्यात दहा वर्षीय बालक वाहून गेला. दीपेश विनोद ब्राह्मणकर रा. रनाळा (ता. पवनी जि. भंडारा) असे मृत बालकाचे नाव आहे.
दीपेश हा शिकवणी वर्गावरून परत येत असताना तो नाल्यात पडला. अडीच तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह आढळला. जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ६१.२ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसे धरणाची ३३ वक्रद्वारे दीड मीटरने उघडण्यात आली आहेत. वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अंतर्गत गावांना जोडणाऱ्या सहा मार्गांवर पाणी असल्याने रहदारी पूर्णतः ठप्प पडली आहे. गावाशी संपर्कही तुटला आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत. रोवणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे.