भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी; गोसेखुर्दचे सर्व ३३ दरवाजे उघडले, ७००८.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 12:48 PM2022-07-14T12:48:22+5:302022-07-14T12:55:21+5:30
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी दुपारी २ वाजता १ मीटरने उघडण्यात आले.
भंडारा : जिल्ह्यात सतत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली असून गत २४ तासात तब्बल ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील २५ घरांमध्ये पाणी शिरले असून भंडारा ते तुमसर राज्यमार्ग आणि भंडारा ते बालाघाट महामार्ग ठप्प झाला आहे.
गत २४ तासांत जिल्ह्यात १४८ मिमी इतका सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात झाला असून, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भंडारा तालुक्यात १६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर या पाच तालुक्यातील २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी आणि गोंडीटोला गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक शेतातील बांधांमध्ये पाणी साचल्याने धान पीक धोक्यात आले आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी दुपारी २ वाजता १ मीटरने उघडण्यात आले. या गेटमधून ७००८.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार
शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे बुधवारी सकाळी ८.१५ वाजता घडली. शुभम विजय लेंडे (२६, रा.मोहगाव देवी) असे मृताचे नाव आहे. यावेळी शेतात काम करणाऱ्या १५ महिला मजूरही किरकोळ जखमी झाल्या.