दमदार पावसाने धान पिकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:46+5:302021-09-09T04:42:46+5:30
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र अपेक्षित पाऊस कोसळतो . परंतु यावर्षी पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. काही भागात मध्यंतरी ...
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र अपेक्षित पाऊस कोसळतो . परंतु यावर्षी पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. काही भागात मध्यंतरी रिमझिम पाऊस बरसला. मात्र धान पिकासाठी हा पुरेसा पाऊस नव्हता. अशातच पोळ्याच्या दिवसापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सर्वत्र दमदार हजेरी लावली. गत २४ तासांत भंडारा तालुक्यात ४२.२ मिमी, मोहाडी तालुक्यात ५६.१ मिमी, तुमसर ४८ मिमी, पवनी ४.२ मिमी, साकोली २६ मिमी, लाखांदूर ४५.३ मिमी, लाखनी २६.४ मिमी असा सरासरी ३५.५ मिमी पाऊस कोसळला.
१ जून ते ८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १११२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. या कालावधीत आतापर्यंत ८८८ मिमी म्हणजे ८० टक्के पाऊस कोसळला आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात ७५२.२ मिमी, मोहाडी १०८५.६ मिमी, तुमसर ७९७.७ मिमी, पवनी ८१७.९ मिमी, साकोली १००८.९ मिमी, लाखांदूर ८०२.७ मिमी, लाखनी ९५१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मोहाडी तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस भंडारा तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पातळीतही वाढ झाली आहे.
बाॅक्स
गोसे प्रकल्पाचे १५ दरवाजे उघडले
राष्ट्रीय प्रकल्प गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाची पाणीपातळी राखण्यासाठी मंगळवारी रात्री या प्रकल्पाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. १६८६.६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.या प्रकल्पाची पाणीपातळी सद्यस्थितीत २४४.१९० मीटर आहे.