दमदार पावसाने धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:28 PM2019-07-30T22:28:12+5:302019-07-30T22:28:50+5:30

जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.

Heavy rains speed up paddy transplanting | दमदार पावसाने धान रोवणीला वेग

दमदार पावसाने धान रोवणीला वेग

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाच्या झडीने शेतकरी सुखावला : पाणी पातळीत अल्पवाढ, शेतशिवार गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसासाठी चिंतीत झाला होता. परंतु याच दरम्यान वरूणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे धान रोवणीसह शेतीच्या ईतर कामांना चांगला वेग आला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आर्द्रा व पुनर्वसू ही दोन नक्षत्रे कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना तब्बल जुलै अखेरची प्रतीक्षा करावी लागली.
मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाची संततधार झड कायम असल्याने शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा खरीप हंगामातील धानपिकांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या आगमनासाठी अनेक गावांमध्ये पूजा अर्चा करण्यात येत होत्या. ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. त्यांचे पऱ्हे धान रोवणी योग्य झाले आहेत. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये रोवणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षीतरी अपेक्षीत उत्पन्न होणार का, या विवंचनेत असताना पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटी का असेना रोवणीला प्रारंभ झाला. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या धान उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पºह्यांचे योग्य नियोजन करून फक्त एक रोप वीस बाय वीस अंतरावर रोवणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पऱ्हे कमी असले तरी बचत होणार आहे.
मजुरीच्या दरात वाढ
पावसाच्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. त्यातच पावसाने आगमन केल्याने सर्वच शेतकऱ्यांची मजूरांसाठी मागणी असल्याने मजुरांसह ट्रॅक्टरचे चिखलनीचे दर वाढले आहेत. बैलजोड्या कमी झाल्याने शेतकऱ्यांना चिखलनीसाठी वेळेवर ट्रॅक्टर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आता रोवणीच्या कामांमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर महिलांना सुगीचे दिवस आले आहेत.

Web Title: Heavy rains speed up paddy transplanting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.