हेल्मेटसक्ती आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:18 PM2018-11-30T23:18:30+5:302018-11-30T23:18:53+5:30
रस्ता अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलत शनिवार १ डिसेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी वाहन चाकलांसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सज्ज झाली आहे तर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना हेल्मेटशिवाय शासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्ता अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलत शनिवार १ डिसेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी वाहन चाकलांसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सज्ज झाली आहे तर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना हेल्मेटशिवाय शासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत झाली. त्या बैठकीत हेल्मेट सक्तीबाबत चर्चा होवून शनिवारपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट शक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी ही अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत निर्णय घेतला आहे. दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चालविणारा आणि मागे बसणाºयालाही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. हेल्मेट न घालणाºया दुचाकी चालकाला ५०० रूपये दंड आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय मार्क असलेले हेल्मेटच वापरणेही अनिर्वाय आहे.
सामान्य नागरिकांसोबतच शासकीय कार्यालयातील दुचाकी वापरणाºया अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना पाठविले आहे.
तसेच जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय व इतर इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच चारचाकी वाहनाने येणाºया सर्व वाहन चालकांना सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे शहरात हेल्मेट खरेदी करणाºयांची संख्या वाढली असून शुक्रवारी शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या हेल्मेट दुकानात नागरिकांची गर्दी दिसून आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कार्यकारी अभियंता डी.एन. नंदनवार, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे, महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक राजा पवार, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.
ेतर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित
हेल्मेट सक्ती अंतर्गत वारंवार दंडात्मक कारवाई करूनही एखादा वाहन चालक हेल्मेटचा वापर करत नसेल तर त्याचे लायसन्स तीन महिन्यासाठी सस्पेंड केले जाणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी पोलीस, आरटीओ कार्यालय, महामार्ग, सुरक्षा पथक आणि सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मदत करणार आहेत.
जिल्ह्यात १८ ब्लॅक स्पॉट
जिल्ह्यात १८ अपघात प्रवणस्थळ (ब्लॅक स्पॉट) असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण स्थळाबाबत कार्यवाहीचा अहवाल छायाचित्रासह तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी या बैठकीत दिल्या आहेत. तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाºयांनी नगरपरिषदेवर नाराजी व्यक्त केली आहे.
मोबाईलवर बोलणे पडणार महागात
हेल्मेट सक्तीसोबतच दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलनेही आता महागात पडणार आहे. मोबाईलवर बोलताना चालक आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच मद्य प्राशन करणारे वाहन चालकही पोलिसांच्या निशान्यावर आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी अशा दुचाकी चालकावंर कारवाई केली जाईल.
स्पीडगनद्वारे वाहनांचा वेग तपासणार
भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहने धावतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांना निर्बंध आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे फलक तात्काळ लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. तसेच पोलीस विभागाने स्पीडगनद्वारे वाहनांची वेगमर्यादा तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अतिवेगाने जाणाºया वाहनांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधीकरण पाहणी करेल.
जिल्ह्यात १ डिसेंबरपासून हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस शाखा मोहीम राबविणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गतही कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी आयएसआय मार्क असलेले हेल्मेट वापरावे.
-बाळकृष्ण गाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक भंडारा.