दिवाळीत गरजवंताना पोलीस विभागाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:00 AM2020-11-13T05:00:00+5:302020-11-13T05:00:24+5:30
माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सुहास खरे यांच्या चमूच्या सहकार्याने पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार बी.एस.मुंडे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील नक्षलबहुल आदिवासी भागात पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधीकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील आंभोरा येथे सोमवारी आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त विविध भेटवस्तू देऊन दिवाळी भेट कार्यक्रम साजरा करण्यात आला.
माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सुहास खरे यांच्या चमूच्या सहकार्याने पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार बी.एस.मुंडे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात.
या समाजाला मुलभुत सुविधांची गरज असताना प्रेमाची आवश्यकता आहे. याबाबीकडे लक्ष देत आदिवासी नागरीक व त्यांच्या मुलांना मदत मिळावी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.
कोराेनाच्या संसर्गामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्योग धंदे बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग हा अतिदुर्गम व संवेदनशील असून या भागात राहणारे लोक हे बहुसंख्येने आदिवासी बांधव आहेत.
या भागात कोणतेही रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने नागरीकांची शहरी भागाकडे ओढ लागते. मात्र यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचे गोंदिया पोलिसांनी ठरविले आहे. माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर या मंडळाचे प्रमुख सुहास खरे व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवाराच्या मदतीने गावातील २०० ते २५० लोकांना धोतर, साडया, ब्लँकेट, दिवाळी फराळ व मुलांना शालेय वह्या,पेन पेन्सील आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यादरम्यान
रांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करुन बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणी मान्यवरांनी सहकार्य केले.