भंडारा जिल्ह्यातील हेमंत नंदनवार युपीएससी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:35 PM2020-08-04T20:35:16+5:302020-08-04T20:35:42+5:30
मोहाडी येथील हेमंत रमेश नंदनवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून देशभरात त्याचा ८८२ वा क्रमांक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी येथील हेमंत रमेश नंदनवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून देशभरात त्याचा ८८२ वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे तो सध्या उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे नाबार्डमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
मंगळवारी दुपारी युपीएससीचा निकाल घोषीत होताच हेमंतने लखनऊ येथून आपल्या कुटुंबियांना मोबाईलवरून युपीएससी (आयएएस) उत्तीर्ण झाल्याची आनंद वार्ता दिली. तो देशभरातून ८२२ रँकवर उत्तीर्ण झाला आहे.
त्याच्या कुटुंबात आई-बाबा, दोन मोठे भावंड आहेत. त्याच्या वडिलांचे मोहाडीतील बाजारपेठेत कापड विक्रीचे दुकान आहे. गावोगावी व शहरात कपडे विकून त्यांनी संसाराचा गाढा ओढला. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी कुंजनबाई यांचीही मोलाची साथ लाभली. संघर्षमय जीवनातून घडलेल्या हेमंतने शैक्षणिक वाटचालीत कधीही मागे वळून पाहिले नाही.
हेमंतने कठोर परिश्रम व मेहनतीतून युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे भ्रमणध्वनीहून सांगितले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातून हेमंतच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे यापूवीर्ही हेमंतने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची पूर्व तथा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र मुलाखतीत त्याला यश मिळाले नव्हते. त्याने यानंतर आयएएससाठी कठोर मेहनत घेतली व ती सिद्धीला नेली.