भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 01:34 PM2018-05-08T13:34:33+5:302018-05-08T13:38:18+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. ही निवडणूक भाजपासाठी सर्वार्थाने महत्त्वाची असल्याने ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे, प्रशिक्षण घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले. तर शनिवार, ५ मेपासून विधानसभानिहाय मेळावे सुरु आहेत.
या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात.
भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी
वर्ष २०१४पासून आतापर्यंत भाजपने बहुतांश निवडणुका जिंकल्या. त्यामागे त्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी काम करीत असते. संघटन बांधणी, बुथ कमिटी, कार्यकर्त्यांचे मेळावे, प्रशिक्षण हा या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. तर्कशुद्धरीत्या निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना यश आले आहे. या स्ट्रॅटेजीचा बिमोड कसा करायचा, याचे आव्हान कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर असणार आहे.
राष्ट्रवादी १० मे रोजी दाखल करणार नामांकन
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता जलाराम मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.
दि.१० मे रोजी भाजप उमेदवारही नामांकन दाखल करणार असल्यामुळे गुरूवारला दोन्ही पक्षाचे शक्तीप्रदर्शन दिसून येणार आहे.