रानडुकरांचा शेतशिवारात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:19+5:302021-09-05T04:39:19+5:30
लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव नाल्याशेजारील भातक्षेत्रात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसा नाल्याकाठावरील झुडपे व शेजारील सागवान जंगल आश्रयाला मिळाल्याने रानटी ...
लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव नाल्याशेजारील भातक्षेत्रात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसा नाल्याकाठावरील झुडपे व शेजारील सागवान जंगल आश्रयाला मिळाल्याने रानटी डुकरांची फौज निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी भातखाचरावरील गवतात असलेले जीवजंतू खाण्यासाठी हल्ला चढवतात. भातखाचरे खचवून त्यातील गांडूळ खाण्यासाठी धडपड करतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुरू होत आहे.
पंधरा दिवसांनंतर हीच रानडुकरे धानपिकात धुमाकूळ घालणार आहेत. शेतकऱ्यांवरही हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी आहे.
बॉक्स
नुकसानीचा अत्यल्प मोबदला
शेतमाल व भातखाचऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी शेतकरी अर्ज करतात. मात्र, त्यांना अत्यल्प मोबदला वर्षभरानंतर दिला जातो. अर्जासाठी लागणारे दस्तावेज जमा करताकरता नाकीनऊ येते. मात्र, त्या तुलनेत नुकसानीचा मोबदला फारच कमी मिळतो. नुकसानीच्या दहा टक्केसुद्धा मोबदला शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही.
वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. गस्त घालण्याकरिता समस्त कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. वन्यप्राणी पर्यावरणाचे घटक असल्याने त्यांचे संरक्षण महत्त्वाचेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भात अर्ज सादर करावेत.
- घनश्याम ठोंबरे,
वनक्षेत्र अधिकारी, अड्याळ