सीटी-1 वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची उच्चस्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 11:46 PM2022-10-04T23:46:45+5:302022-10-04T23:47:25+5:30
सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ हुलकावणी देत आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन जिल्ह्यांत १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या उपस्थितीत मंगळवारी नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे जंगलात तीन पथक तळ ठोकून असून वाघाच्या मार्गावर पाच मचान आणि ६१ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ हुलकावणी देत आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला वन्यजीव नागपूर पूर्वचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर आणि चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक, गडचिरोलीचे वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्यासोबत भंडारा, गोंदिया, वडसा आणि ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक उपस्थित होते. या बैठकीत वाघाला कशा पद्धतीने जेरबंद करायचे यावर चर्चा करण्यात आली. वन्यजीव मानवी संघर्ष प्राण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान हा वाघ सध्या वडसा जंगलात असल्याची माहिती आहे. लाखांदूर तालुक्यात या वाघाचा संचार असल्याने त्याला पकडण्यासाठी स्थानिक वनविकास महामंडळाच्या पथकासह गोंदिया आणि भंडारा येथील जलद कृती दलाचे जवान जंगलात तळ ठोकून आहेत. हा वाघ ज्या मार्गावरून जातो त्या परिसरात पाच मचानी उभारण्यात आल्या असून त्यावर खडा पहारा आहे. तसेच ६१ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हा वाघ हुलकावणी देत आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नियंत्रण अधिकारी
सीटी-१ वाघ हा अत्यंत हुशार असून तो रात्रीच्याच वेळी बाहेर निघतो. त्यामुळे त्याला जेरबंद करणे कठीण जात आहे. वाघाला बेशुद्ध करुन पकडण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ दिवसांपूर्वीच दिली आहे. आता या वाघाला जेरबंद करण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून वन्यजीव पूर्व नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबविली जाणार आहे.
सीटी-१ वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात तैनात करण्यात आले आहेत. लवकरच या वाघाला जेरबंद करण्यात यश येईल. मात्र, लाखांदूर तालुक्यातील व वाघाचा संचार असलेल्या जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये. तसेच रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर निघू नये.
-राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा