महामार्गावर आंदोलन करण्यास येणार बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:27 PM2018-10-05T22:27:41+5:302018-10-05T22:28:00+5:30
जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे.
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे. मात्र यामुळे या मार्गावरून जाणाºया सर्व सामान्य प्रवाशांसह रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड हाल सोसावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आणि कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होणाºया आंदोलनास बंदी घालण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. लवकरच जिल्हा प्रशासन महामार्गावर आंदोलनासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्याच्या तयारीत आहे.
भंडारा शहरातून कोलकाता-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहराला बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक याच माहामार्गावरून होते. रायपूर ते नागपूर हा अतिशय व्यस्त असा महामार्ग आहे. अहोरात्र वाहतूक सुरू असते. त्यात अवजड वाहनांसह स्कूल बसेस, रुग्ण वाहिका आदी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु आंदोलनात या राष्ट्रीय महामार्गालाच लक्ष केले जाते. मागणी कोणतीही असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्याकडेच आंदोलकांचा कल असतो. गत काही वर्षात चक्का जाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन असे विविध आंदोलने राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध गावात आंदोलने केली जात आहे. गत महिनाभरापासून तर धान पिकाच्या पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे या मार्गावरून जाणाºया वाहन धारकांना मोठा त्रास होतो. चक्का जाम सुरू झाला की, अवघ्या काही वेळातच वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागते. विशेष म्हणजे भंडारा शहरात आंदोलन असेल तर त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही होतो. शहरातच अवजड वाहने उभे राहत असल्याने शहरवासीयांना रस्ता पार करणे कठीण जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक होते. अनेकदा रस्ता रोको आंदोलनाचा फटका रुग्णांना बसतो. वाहनांची कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता काढत रुग्णालयापर्यंत पोहचणे कठीन जाते. भंडारा शहरालगत अनेक शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथे जाणाºया स्कूल बसही अडकून पडतात. बाहेरगावावरील वाहनधारक ताटकळत असतात. शहराच्या ठिकाणी आंदोलन झाले तर खाण्याची सोय होवू शकते. परंतु ग्रामीण भागात आंदोलन झाल्यास उपाशी रहावे लागते. वाहनांमधील महिला प्रवाशांना प्रसाधनाची मोठी समस्या येते. हा सर्व प्रकार वर्षातून अनेकदा अनुभवावा लागतो.
आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास मज्जाव करणारा कायमस्वरूपी मनाई वटहूकुम निर्गमित करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने भंडाराच्या जिल्हा पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. ५ आॅक्टोबर रोजी निर्गमित या पत्रात तातडीने अभिप्राय जिल्हा प्रशासनाला पाठवावे, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी म्हटले आहे.
सर्व सामान्य प्रवाशांना त्रास होवू नये याकरिता राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास प्रतिबंध घालण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. लवकरच हा मनाई आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे.
-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भंडारा.