महामार्गाची झाली दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:29 PM2019-07-29T22:29:54+5:302019-07-29T22:30:19+5:30
वर्षभरापासून मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. एकेरी मार्गही येथे पूर्ण झाले नाही. त्याचा फटका आता वाहतुकधारांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला रस्ता चिखलमय झाला आहे. जडवाहनामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वर्षभरापासून मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. एकेरी मार्गही येथे पूर्ण झाले नाही. त्याचा फटका आता वाहतुकधारांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला रस्ता चिखलमय झाला आहे. जडवाहनामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पाऊस पडल्यानंतर रस्ता चिखलमय झाला आहे. त्यावरून जड वाहने सुद्धा घसरत आहेत. दुचाकी तर चालविणे अत्यंत धोकादायक झाले आहे. रस्ता रूंदीकरण, मातीमिश्रीत मुरूम, तर कुठे मातीचा भराव करण्यात आला. पावसानंतर ते मातीचे चिखलात रूपांतर झाले आहे.
एक वर्षापासून रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्ता रूंदीच्या व सिमेंट काँक्रीटकरणाला एका वर्षापुर्वी सुरूवात झाली होती. एक ते दीड वर्षात सदर रस्ता तयार होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पॅचेस पूर्ण करणे गरजेचे होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. सदर रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वाहनधारकांना येथूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.
लहान पुलाचे बांधकाम धोकादायक
राष्ट्रीय महामार्गावर लहान मोठे अनेक पूल असून त्यांचे बांधकाम सुरूच आहे. रपटा व नाल्यावरील पूल मोठा असल्याने पावसात पोचमार्ग पाण्याखाली जात आहे. त्यामुळे रस्ता या पावसाळ्यात बंद झाला होता. महामार्ग प्राधीकरणाने सर्वात प्रथम पूलाचे बांधकाम पूर्णची गरज आहे.