त्याच्या येण्याने ती सुखावली अन् तृप्तही झाली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:42 AM2017-07-21T00:42:23+5:302017-07-21T00:42:23+5:30
अनेकजण त्याची प्रतिक्षा करीत होते. आज उद्या येणार याचा अंदाजही बांधला जायचा. अखेर तो आला त्याच्या येण्याने
अनेकांच्या हाताला काम : मजुरीच भरमसाठ वाढ
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अनेकजण त्याची प्रतिक्षा करीत होते. आज उद्या येणार याचा अंदाजही बांधला जायचा. अखेर तो आला त्याच्या येण्याने मन तृप्तही झाले. तिचा सखा अखेर आल्याने ती सुखावली. त्याच्या सुखावण्याचा आनंद साऱ्यांना अनुभवता आला. तो आल्याने सर्व कामात व्यस्त झाले. तो म्हणजे कोण या संभ्रमात पडू नका. ज्यांची मृगापासून प्रतिक्षा बघत होतो तो पाऊस होय.
यापूर्वी आला पण, त्याने चिंताच अधिक वाढविली होती. पाचव्या नक्षत्रात त्याने धो-धो धुतले. बरसला. एवढा पडला की, वसुंधरेची काळ्या मातीत तो दिवसायला लागला. खरीप हंगामाची खरी सुरूवात त्यानेच १९ जुलैला करून दिली. मोहाडीची सुरनदीचा प्रवाह सुरू झाला. पावसाच्या येण्याने सुर नदी सुखावली. तृप्तही झाली. एवढेच कशाला, पावसाचे पाणी सुर नदीत इतका प्रवाहित झाला की, ती ओथंबून दूथडी वाहत आहे. एका वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुर नदीच्या दोन कडांना या पाण्याने मिळवून दिले आहे. पाण्याने त्या दोन कडांना काही दिवसासाठी मित्र बनविले आहे.
पाऊस बरसल्याने तलाव, बोड्या, लहान धरण, ओढे, नाले अन् नद्यात पाणी दिसू लागले आहे. ओठ्यातून झुळझूळू वाहणाऱ्या पाण्याने सौंदर्यात वाढ केली आहे. पाणी व धरणीचा हिरवा चुडा मनमोहून घेत आहे. याशिवाय खरीप हंगामाच्या पऱ्हांना जपणारा शेतकरी सुखी झाला आहे. शेतात पाणी सिंचित झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला सुरवात केली आहे. रोवणीचा हंगाम एकाचवेळी सुरू झाली. त्यामुळे, रोवणी करणाऱ्या महिलांना हंगामी रोजगार मिळायला सुरूवात झाली. साधारणत: दोनशे रूपये प्रति दिवस मजुरीचा दर आहे. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी रोवणी कामाला सुरूवात केल्याने मजुरांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे मजुरीत वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. धान लावणीचा हंगाम पोळा सणापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सद्या शेतकरी यंत्राच्या मदतीने रोवणी करतो. त्यामुळे चिखलणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा अभाव दिसू लागला आहे. प्रति एक तासासाठी चिखलणी करण्याचा ट्रॅक्टरचा भाडा पचशेच्या पुढे गेला आहे. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्पर्धा सुरू केली आहे. पावसाने आज दुपारनंतर हजेरी लावली. पाण्याला पाणी असला तर चिखलणी करणे सोप होते. त्यामुळे रोवणी करण्याच्या कामात खंड पडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काल मोहाडी येथे ६०.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरला आहे. तसेच पाऊस झाल्याने वृक्षरोपण केलेल्या रोपांना जलसंजीवनी प्राप्त झाली. पाऊस नसल्याने वृक्षारोपण केलेल्या रोपांनी मान खाली घातली होती. एकंद त्याच्या येण्याने सगळेच सुखावले. या आनंदाच्या क्षणाची वाट बघणारा बळीराजा तर अधिकच आनंदी दिसून आला.