ऐतिहासिक तुमसर शहर ‘हायटेक’ करणार
By admin | Published: March 20, 2016 12:39 AM2016-03-20T00:39:19+5:302016-03-20T00:39:19+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तुमसर शहरातचा सर्वांगिण विकास करण्याचा ध्यास नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
नगराध्यक्ष कारेमोरे यांचा संकल्प पथकाने केली विकासाची पाहणी, राजकीय हेवेदावे सारले बाजूला
तुमसर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तुमसर शहरातचा सर्वांगिण विकास करण्याचा ध्यास नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हिरवे तुमसर, सुंदर तुमसर असे घोषवाक्य देवून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे.
नगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या संकल्पाला येथील नागरिकांनीही उत्तम साथ देण्याचा विळा उचलला आहे. दरम्यान नगरपरिषद सभागृहात आयोजित सभेत नगराध्यक्षांनी कर्मभूमीचा विकास हाच आपला ध्यास असून तंत्रज्ञानाच्या युगात नगरपरिषद हायटेक करण्याचा मानस व्यक्त केला.
विकास कार्यात राजकीय द्वेशभावना व राजकारण न करता केवळ विकास कार्य करणे हाच संकल्प आपण केला. नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे पुढे म्हणाले, तुमसर नगरपरिषदेची स्थापना १८६७ मध्ये झाली होती. सध्या तुमसर शहराची लोकसंख्या ४४ हजार ८३६ इतकी आहे. शहरात ११ हजार घरे आहेत. खुल्या जागेवर शौच करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त करावयाचे असल्यास त्याला शौचालयाचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमसर शहराची भौगोलिक रचना पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून केली होती. सध्या मात्र शहराला अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी येथे अतिक्रमण काढण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. पालिकेने घेतलेल्या या पुढाकाराला सर्वच स्तरातून सहकार्य मिळत आहे. या सभेला नगरपरिषद गटनेता प्रमोद तितीरमारे, श्याम धुर्वे, नगरसेवक आशिष कुकडे यांनीही संबोधित केले. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. आभार नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे यांनी मानले. तत्पश्चात जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साबळे व पथकाने तुमसरातील सुसज्जीत विवेकानंद वाचनालय, गांधीसागर उद्यान, न.प. कनिष्ठ महाविद्यालय, गांधी प्राथमिक शाळा, जलशुद्धीकरण केंद्र, नवनिर्मित शौचालय बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष सरोजताई भुरे, नगरसेवक सलाम तुरक, अॅड. विवेक स्वामी, कविता साखरवाडे, विजया चोपकर, मीना गाढवे, भाग्यश्री निखाडे, चंदा धार्मिक, शालिनीताई पेठे, सविता ठाकूर, किशोर भवसागर, लालू हिसारिया, शोभा लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )
प्रमुख चौकात लागणार सीसीटीव्ही
तुमसर शहरात प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. दलित वस्ती योजनेत २५ कोटींची विकास कामे करण्यात आली. १०३ सिमेंट रस्ते १०७ नाल्या बांधकाम मटन व मासोळी बाजाराचे नूतनीकरण करण्यात आले. पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट, नगरपरिषदेचे कामकाज ई-गर्वनन्स करण्यात आले.