पवनीचा ऐतिहासिक दिवाण घाट मोजतोय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 02:01 PM2021-11-09T14:01:00+5:302021-11-09T14:10:08+5:30

भोसलेकालीन दिवाण घाट पवनी शहराचे वैभव आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे.

The historical Diwan Ghat of Pawani is extincting due to negligence | पवनीचा ऐतिहासिक दिवाण घाट मोजतोय अखेरच्या घटका

पवनीचा ऐतिहासिक दिवाण घाट मोजतोय अखेरच्या घटका

Next
ठळक मुद्देपर्यटकांची पाठ : देखभाल दुरुस्तीअभावी घाट खचलेल्या अवस्थेत

अशोक पारधी

भंडारा : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नगरी पवनीत पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक स्थळे आहेत. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पवनी शहरासह प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पालाही पर्यटक भेटी देतात. मात्र, पवनी शहरातील पर्यटन स्थळांची अवस्था पाहता, अनेकांचा भ्रमनिरास होतो. 

वैनगंगेच्या तीरावर अनेक घाट असून, यातील दिवाण घाट प्रसिद्ध आहे. मात्र, हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असल्याने पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. 

पवनीनगराचे सभोवताल असलेल्या इंग्रजी यू आकाराचे प्राचीन मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला भोसलेकालीन पराकोट व जवाहर गेट, वैनगंगा नदी तीरावरील घाट, सुस्थितीत असलेले शेकडो मंदिर, उत्खननात सापडलेले बौद्ध स्तुपाचे अवशेष, गरुड खांब, इंदिरा सागर गोसीखुर्द धरण, उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य, रुयाळ सिंदपुरी येथील महासमाधीभूमी स्तूप असे कित्येक स्थळ पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यापैकी पवनीनगरातील प्राचीन वारसा असलेल्या स्थळांना विशेष महत्त्व आहे, परंतु लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्राचीन वारसा नामशेष होण्याचे मार्गावर आहे.

प्रामुख्याने ३५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या घाटापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट पूर्णतः नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. नगराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी तीरावर दिवाण घाट, पान खिडकी, ताराबाई घाट, वैजेश्वर घाट बांधलेले आहेत. चौकोनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आलेले आहे. आतापर्यंत नदीला आलेल्या महापुरामुळे घाटाची दुरवस्था झालेली आहे. लोकप्रतिनिधी, नगरपालिका प्रशासन व नगरसेवकांनी वैजेश्वर घाटाला विशेष महत्त्व देऊन पर्यटन विकास निधी वापरून घाटाला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले व भंडारा मार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिवाणघाटाच्या डागडुजीकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. दोन घाटाचा समूह असलेला दिवाण घाट आकर्षक आहे. त्यापैकी एक घाट पूर्णतः खचलेल्या स्थितीत आहे. दुसरा घाट व बुरुज ढासळत आहे. दखल न घेतल्यास चार-सहा महिन्यांत दिवाण घाट पूर्णतः ढासळलेले असेल.

प्राचीन वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न नाही

मकर संक्रांत, कार्तिक, हरतालिका व गणेशोत्सव अशा सणांचे वेळी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने दिवाण घाटाकडे आकर्षित होतात, परंतु भग्नावस्था पाहून प्रशासनावर रोष व्यक्त करतात. नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत अनावश्यक बांधकामावर कोट्यवधींचा निधी खर्च केला, परंतु प्राचीन वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने व पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले पवनीनगर वैनगंगा नदी काठावरील घाट आणि शेकडो मंदिर, यामुळे विदर्भाची काशी म्हणून प्रख्यात आहे. ऐतिहासिक वारसा जतन करून, भावी पिढीला प्राचीन कलेचा संदेश देता यावा. पर्यटन विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, हा दृष्टिकोन ठेवून ऐतिहासिक वारसा जतन करावा, अशी माफक अपेक्षा आहे.

Web Title: The historical Diwan Ghat of Pawani is extincting due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.