अतिवृष्टीचा फटका; पितृपक्षात भाजीपाल्याचे दर झाले दुप्पट, कोथींबीरही महागले
By युवराज गोमास | Published: October 2, 2023 04:38 PM2023-10-02T16:38:49+5:302023-10-02T16:39:17+5:30
मागणीत वाढ तर बाजारात आवक घटल्याचा परिणाम
भंडारा : गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरूवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. परंतु, यंदा अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे नुकसान होवून बाजारात आवक घटली आहे. याचदरम्यान मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने वाढले आहेत. भाज्यांचे स्वाद वाढविणारा कोथींबीरही महागला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते. वांगे, टमाटर, भेंडी आदींना १० ते २० रूपये प्रति किलोचा दर मिळता होता. परंतु, गणेशोत्सव सुरू होताच भाजीपाला कडाडला. भाजीपाल्याचे दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. पितृपक्षात भाववाढीचा आलेख चढतच आहे. नागरिकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी लागत आहे. एकीकडे भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे; तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे.
पितृपक्षात भेंडी, दोडके, चवळी शेंग आणि लाल भोपळ्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे ४० रुपये प्रति किलो असलेली चवळी शेंग आता ८० ते १०० रूपयांवर गेली आहे. दोडके ८० रूपये, वांगे ६० रूपयांवर पोहचले आहे. टमाटर मात्र स्थीर आहे. भाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसतो आहे. आणखी महिनाभर भाववाढ राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
भाजीपाला दर प्रतिकिलो
वांगे ५० ते ६०
टमाटर १५ ते २०
चवळी ८० ते १००
शिमला ६० ते ८०
दोडके ७० ते ८०
फुलकोबी ४० ते ६०
पत्ताकोबी ३० ते ४०
हिरवी मिरची ६० ते ८०
टोंडरी ४० ते ६०
लालभाजी २० रूपये जुडी
कारले ६० ते ८०
मेथी ८० ते १००
कोथींबीर १८० ते २००
भेंडी ३० ते ४०
पालेभाज्या महागल्या
पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर आणि मेथीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे बाजारात ४० ते ६० टक्के पालेभाज्यांची आवक घटली आहे. कोथिंबीरच्या दर वधारले असून मेथीची भाजी पावाने विकली जात आहे.
'नैवद्यात' या भाज्यांचा समावेश
श्राद्धाच्या नैवद्यात भाज्यांमध्ये कोहळा, भेंडी, चवळी, दोडके, गिलके, कारले, काकडी आदी भाज्यांचा समावेश असतो. श्राद्धाच्या दिवशी या सर्व भाज्यांची मिश्र भाजी करण्यासह भजी. वडा, खीर, कडी, वरणभात, पोळी, अळूच्या पानाची वडी आदी पदार्थ केले जातात. तर्पण व पिंडदान करण्यात येऊन त्यानंतर कावळ्याला घास भरविला जातो.