उमेदवारीचा पोळा आज फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:45+5:30
नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख चार पक्षांचे उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यात होते. आता सर्वच पक्ष सोमवारी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोणत्याही पक्षाने रविवारपर्यंत आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. आता सोमवार हा नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा पोळा फुटणार आहे. कुणाला तिकीट मिळणार आणि कोण बंडखोरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही पक्षांत अद्यापही उमेदवारीचा घोळ सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख चार पक्षांचे उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यात होते. आता सर्वच पक्ष सोमवारी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी तिकीट मिळालेल्या उमेदवारांची तारांबळ उडेल, तर इच्छुक असलेल्यांना तिकीट नाकारल्यास त्यांची बंडखोरीची तयारी राहणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. मात्र, सर्वच पक्षांत उमेदवारीवरून ओढाताण सुरू असल्याचे दिसत आहे. बाहेरून पक्षात आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जात असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे निष्ठावंत नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी होण्याची सध्यातरी कोणतीही शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता नवाब मलिक यांनी शनिवारी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडे काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. शिवसेना मात्र संपर्कात आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार काय, यावरही रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, सध्यातरी सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत दिसत आहेत.
नामांकनासाठी होणार मोठी गर्दी
- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घोषित झाली नाही. त्यामुळे सोमवारी सर्वांचीच तहसील कार्यालयात नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वेळेत उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वांचीच धडपड राहणार असून, प्रशासनावरही ताण येणार आहे.