तुमसर रेल्वेस्थानकात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:31 PM2019-07-17T22:31:25+5:302019-07-17T22:32:39+5:30
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील तुमसर रोड रेल्वेस्थानक स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळख आहे. परंतु येथे भटक्या कुत्र्यांचा ठिय्या पाहावयास मिळते. रेल्वे स्थानकात कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील तुमसर रोड रेल्वेस्थानक स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळख आहे. परंतु येथे भटक्या कुत्र्यांचा ठिय्या पाहावयास मिळते. रेल्वे स्थानकात कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या देशात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. दक्षिण पूर्व रेल्वेने नागपूर विभागात सदर अभियान यशस्वी राबविले आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा समावेश स्वच्छ रेल्वे स्थानकात आहे, परंतु मागील काही महिन्यापासून या रेल्वेस्थानकात बेवारस कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. कुत्र्यांच्या टोळीने येथे भय निर्माण झाले आहे. विशेषत: लहान मुले, महिलांच्या जीवाला धोक्याची शक्यता येथे बळावली आहे.
कुत्र्यांची टोळी बिनधास्त रेल्वेस्थानकात फिरताना दिसते. पावसाळ्यात कुत्र्यांपासून धोक्याची शक्यता अधिक असते. स्टेशन अधीक्षक कार्यालयासमोरून कुत्र्यांची टोळी मोठ्या ऐटीत फिरत असल्याची चित्रफित एका प्रवाशाने 'लोकमत'ला दिली. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी कुत्र्याच्या टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
कुत्र्यांची टोळी रेल्वेस्थानकात एकमेकांवर भुंकणे, आरडाओरड करणे, पाठलाग करणे आदी त्यांच्या क्रिया सुरूच राहतात. प्रवाशी गाडी येण्याच्या वेळेस प्रवाशांना या टोळीचा मोठा त्रास जाणवतो. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी कुत्र्यांच्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.