आशा गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:21 AM2019-09-04T01:21:20+5:302019-09-04T01:22:48+5:30
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती समितीची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे अशा आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्याची कामे ठप्प झाल्याचे दिसत आहे.
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती समितीची मागणी आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना मिळणारे मानधन हे दारिद्र्य रेषेखालील व किमान वेतनाखालील असून त्यांना वेठबिगारी सारखे वागविले जाते.
गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंत अंगणवाडी सेविकेऐवढे तरी मानधन देण्यात यावे निवेदनात म्हटले आहे. याबाबत २२ २३ जानेवारी २०१९ रोजी मुंबई मंत्रालयात व ६ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.
तसेच १४ जून २०१९ रोजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आणि यानंतरच्या बैठकितही आशा स्वयंसेवकांचे मानधन अडीच ते तीन पट वाढविण्यात येईल असे ठोस आश्वासनही देण्यात आले होते.
आशा स्वयंसेवकांना सायकल तर गटप्रवर्तकांना स्कुटी देण्याचे मान्य केले. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आशा व गटप्रवर्तकाचे मानधन अडीच ते तीन पट वाढविण्याबाबत विधान परिषदेमध्ये निवेदन दिले होते. यासंबधी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी मानधन वाढीबाबत आदेश काढण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आजपासून आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संपाची हाक दिली. सदर जिल्हा परिषद भंडारा समोर कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महसचिव प्रिती मेश्राम यांचे नेतृत्वात सोनू सार्वे, सुनिता डाकरे, तुलना बडोले, श्ुाभांगी मेश्राम, मंगला गौरी, मंदा मस्के आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.