सर्व आस्थापनांना मतदान करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:51 AM2024-11-11T11:51:18+5:302024-11-11T11:52:47+5:30
मतदानासाठी संधी : अपवादात्मक स्थितीत दोन तासांची सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडत आहे. जिल्ह्यातील भंडारा, साकोली व तुमसर या तील मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपल्या मतदारसंघात जाऊन मतदान करता यावे, यासाठी २० नोव्हेंबर रोजी सर्व आस्थापनांना मतदानासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी, इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल; मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. उद्योग विभागाअंतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्योगसमूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी सर्व सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.
मतदानाच्या दिवशी पगारी सुटीही मिळणार
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमांत किंवा इतर कोणत्याही आस्थाप- नामध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवड- णुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. यामुळे शासकीय कर्मचारी व खासगी कामगारांना दिलासा मिळणार आहे.
वेतनात कपात केली जाणार नाही
उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना ही सुट्टी लागू राहणार आहे. पोटकलम। (१) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.