अग्निकांडातून बचावलेल्या पाच बालकांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:21+5:302021-01-18T04:32:21+5:30
भंडारा : दहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात दहा बालके गतप्राण झाली होती. यातून बचावलेल्या सात बालकांपैकी पाच ...
भंडारा : दहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात दहा बालके गतप्राण झाली होती. यातून बचावलेल्या सात बालकांपैकी पाच बालकांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहेत. यात गुरुवारी दोन, शुक्रवारी दोन तर रविवारी एका बालकाला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे यापैकी एका बालकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे तर एक बालक उपचारार्थ भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचवेळी सात बालकांना या अग्नितांडवातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या सातही बालकांवर जिल्हा रुग्णालयात असलेल्या कुटुंबकल्याण विभागात तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या कक्षात उपचार सुरू होते. त्यापैकी उपचारार्थ दाखल असलेल्या सातपैकी पाच बालकांना सुटी देण्यात आली आहे. एका बालकाला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने व अन्य आजार उद्भवल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अग्नितांडवानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट देत या घटनेतील बचावलेल्या बालकांची विचारपूस केली होती. या सात बालकांपैकी पाच बालकांना सुट्टी मिळाली असून ते सुखरूप आपल्या मातांच्या कुशीत पोहोचले आहेत .
बॉक्स
अहवालाची प्रतीक्षा कायम
दहा निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतर राज्य शासनाने चौकशीसाठी समिती नेमली होती. यात नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्याचे समजते. मात्र घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी हा अहवाल अजूनही राज्य शासनाला सुपुर्द करण्यात आलेला नाही. दरम्यान हा अहवाल लवकरच सुपुर्द केला जाणार, याबाबतही विविध कयास बांधले जात आहेत. हा अहवाल दोनशे ते अडीचशे पानांचा असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.