ढगाळ वातावरणाने दुसऱ्या दिवशीही भाविकांची निराशा
By admin | Published: February 2, 2016 12:58 AM2016-02-02T00:58:07+5:302016-02-02T00:58:07+5:30
अंबाबाई किरणोत्सव : अलोट गर्दी; आज अखेरचा दिवस
१५० वर्षांची परंपरा संपली : न्यायालयाच्या आदेशाने ग्रामस्थांमध्ये नैराश्य
मासळ : १५० वर्षांची परंपरा असलेला, मासळ येथील शंकरपट, आधुनिक काळातील मासळ महोत्सव, सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अखेर मोडीत निघाला असून आता शंकरपट फक्त इतिहासाच्या पानावरच असणार आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, पटशौकिन व सामान्य माणसांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मासळ येथे गावालगतच असलेल्या पाच हेक्टर सपाट नैसर्गिक परिसर हे पटाची दाण म्हणून प्रसिद्ध आहे. जागोबा आडकू झलके हे त्याकाळातील चिटणीसांकडे असलेले दिवाणजी म्हणून काम पाहायचे. भौगोलिकदृष्ट्या मासळ हे उत्तम ठिकाण असल्याने व शेती व्यवसायापासून उसंत मिळत असल्याने चिटणीसांच्या परवानगगिने त्यांनी मासळ येथे शंकरपटाला सुरूवात केली होती.
या शंकरपटानिमित्त जिल्हाभरापासून शेतकरी, पटशौकिन आपआपल्या बैलजोड्या आणायचे. अलीकडच्या काळात विदर्भातून दुरवरून बैलजोड्या पटात दाखल व्हायच्या. यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, आबालवृद्धांसाठी मासळचे पट एक पर्वणीच असायची. या पटात उपवर-वधूंची सोयरिकसुद्धा होत होती. म्हणूनच हे पट सामाजिक संबंधाकरिता महत्त्वाचा दुवा होता. पटानिमित्त जोडीमालक बैलांना उच्च दर्जाचा कडबा, कुटार, पौष्टिक खाद्य द्यायचे. पटाच्या बैलांची विशेष काळजी घेतली जायची. गव्हाच्या कणकीचे भिजवून बनवले हुंडे म्हणजे उत्तम खुराक असायची. जोडीमालक आपली जोडी सर्वाेत्तम ठरण्यासाठी पोटच्या पोरांप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचा. त्यासाठी ते बैलांचे मुलांप्रमाणे नामकरणसुद्धा करायचे मिरची, वागूर, शेरू, खिल्लारी, गेंडा, ढोंगाबसी, वाध्या, डुकऱ्या, सरज्या, हरण्या, माळी, ससा, झगड्या अशा प्रकारची बैलांची नावे आज ही शेतकऱ्यांच्या स्मरणात आहेत.
शंकरपटानिमित्त दुरवरून व्यावसायिक यायचे. गावाला जणु यात्रेचे स्वरूप येत होते. लोक या पटातून शेतीची अवजारे गृहोपयोगी वस्तू, बैलांची खरेदी विक्री व्हायची. लाखोंची उलाढाल व्हायची. घरांची डागडुजी, नवीन कपडे, साफसफाई, पाहुण्यांची सरबराई यासाठी गावातील लोक आर्थिक बाजू तयार ठेवून आठ दिवसांपासून तयारीला लागायचे. तेव्हा गावातील रस्ते, पाणी व्यवस्था दिवाबत्तीची सोय याबाबी ग्रामपंचायत स्तरावरून प्राध्यान्याने केल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतरही मासळ येथील शंकरपट मोठ्या थाटात भरायचा. त्यासाठी रामजी चुटे, बाळकृष्ण लांजेवार, बाबुराव मुल, आसाराम ब्राह्मणकर, बाबा ब्राह्मणकर, छगन वांढरे, भास्कर गौरकर या मासळच्या माजी सरपंचांनी आपआपल्या कारकिर्दीत यशस्वीपणे, कोणतेही गालबोट न लागता धडाक्यात पटांचे आयोजन केलेले आहे. गावात अतिशय उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असायचे. यातील मनोरंजनाचे कार्यक्रम व भोजनाची मेजवानी भरगच्च असायची. अशाप्रकारे तीळसंक्रातीनंतरचा तिसऱ्या रविवारपासून तीन दिवसपर्यंत चालणारा हा शंकरपट आठवणीशिवाय दुसरं काहीच उरला नाही. (वार्ताहर)