होम क्वारंटाईन बाहेर पडल्यास गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:25+5:30
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विदेश आणि महानगरातून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र काही जण हातावर शिक्का असतानाही बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. आता होम क्वारंटाईन व्यक्त घराबाहेर पडल्यास त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे. परंतु यातील काही मंडळी हातावर शिक्का असतानाही घराबाहेर निघत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव अशा व्यक्तीमुळे पसरण्याची अधिक भीती असते. त्यामुळे त्यांना घरातच राहण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत. परंतु यातील काही व्यक्ती घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे कोरोनसदृशस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला फिरण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अद्यापही दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर फिरत असल्याचे दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांच्यावर चालान देण्यासह कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहेत.
आता किराणा दुकान २४ तास सुरु
संचारबंदीच्या काळात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी किराणा दुकाने २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे. सध्या किराणा दुकान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र आता ही दुकाने सलग २४ तास सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच औषधी दुकाने, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.
चार व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात
भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात १४ व्यक्ती असून यापूर्वी पाच जणांना सुटी देण्यात आली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात चार रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी, इतर विभाग प्रमुखांची बैठक रविवारी जिल्हापरिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे उपस्थित होते.
सोशल डिस्टन्स्ािंग अनिवार्य
किराणा व भाजीपाला विकत घेण्यासाठी आलेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तालुकास्तरावर परदेश, परराज्य व जिल्हा असा क्रम लावण्यात आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या कामासाठी लष्कराची सेवासुद्धा घेण्यात येणार आहे. कोब्रा बटालियनमध्ये क्वारंटाईन सुविधा उपलब्ध आहे. तेथील क्वारंटाईन टीमसाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व मुख्याधिकाºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करावे. असे आवाहन करण्यात येणार आहे.