अन् ‘यश’ने जोपासली प्रामाणिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:27+5:302021-09-23T04:40:27+5:30
२२ लोक ०१ के भंडारा : लोभ व मोहापासून कुणीही सुटला नाही. मात्र या जगात आजही असे अनेक अपवाद ...
२२ लोक ०१ के
भंडारा : लोभ व मोहापासून कुणीही सुटला नाही. मात्र या जगात आजही असे अनेक अपवाद आहेत. लालच न करता एका १२ वर्षीय मुलाने दहा हजार रुपये व महत्त्वपूर्ण कागदपत्रांनी भरलेली बॅग मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केली. यश संदीप रामटेके असे या प्रामाणिकता जोपासणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी विद्यालयाचा इयत्ता आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याची ही प्रामाणिकता बघून शिक्षकवृंदांनी सत्काराच्या रूपाने त्याचे कौतुक केले.
प्रसंग असा की, तीन दिवसांपूर्वी लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी विद्यालयात मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांची बॅग शाळेतच राहून गेली. या बॅगेमध्ये त्यांचे दहा हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर वर्गातच ते बॅग विसरून निघून गेले. ही बाब यश संदीप रामटेके यांच्या लक्षात आली. त्याने ही बॅग उघडून पाहिली. त्यामध्ये नोटांचे बंडल, एटीएम कार्ड व अन्य कागदपत्रे त्याला आढळले. त्याने ती बॅग सांभाळत मुख्याध्यापिका नंदिनी नवखरे यांच्याकडे सुपुर्द केली. नवखरे यांनी याची माहिती मुख्याध्यापक कहालकर यांना दिली. तीन दिवसांपर्यंत बॅग हरवली म्हणून ते सर्वत्र शोध घेत होते. मात्र बॅगेचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर मुख्याध्यापक नवखरे यांच्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र यशची प्रामाणिकता त्यांच्या मनावर ठसा उमटवून गेली. शिक्षकवृंदांनी ‘यश’चा हा आदर्श अन्य विद्यार्थ्यांसमोर विशेषतः समाजासमोर आणावा या हेतूने त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.
मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्यावतीने यशला चषक, प्रमाणपत्र व पाचशे रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. या सर्वस्वी कार्यासाठी अध्यापिका उर्मिला टिचकुले, सरिता बावनकुळे यांनी विशेष परिश्रम केले. त्यांच्याच आयोजनामुळे यशच्या प्रामाणिकतेची बाब समाजासमोर आली. यशच्या छोटेखानी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नंदिनी नवखरे या होत्या. प्रास्ताविक उर्मिला नरेश टिचकुले यांनी तर आभार सहायक शिक्षिका सरिता बावनकुळे यांनी मानले. याप्रसंगी चंद्रशेखर गिर्हेपुंजे, केशव चोले, सुरेश साठवणे, श्रीवंत लांजेवार, डी.एन. गिर्हेपुंजे आदी मान्यवर उपस्थित होते.