एसटीच्या कार्यक्षम चालक -वाहकांचा होणार आज सन्मान
By admin | Published: June 1, 2016 01:44 AM2016-06-01T01:44:15+5:302016-06-01T01:44:15+5:30
लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ६८ वर्षे पूर्ण होत आहेत.
परिवहन दिन आज : प्रवाशांना फूल देऊन करणार स्वागत
साकोली : लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त परिवहन दिनासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक-वाहकांना २० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
परिवहन दिनाचे औचित्य साधून बसगाड्या आतून आणि बाहेरुन धुण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवास आल्हाददायक वाटावा हा यामागील हेतू आहे. सर्व बसस्थानके सुशोभित करण्यात येणार असून यादिवसाचे महत्त्व प्रवाशांना कळावे यासाठी प्रत्येक प्रवाशांना फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे, त्या आशयाचे परिपत्रक सर्व आगारांना पाठविण्यात आले आहे.
स्वातंत्र्यानंतर अहमदनगर-पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मागील दोन वर्षापूर्वी हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा होत असून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम आखले आहे. राज्यभरातील २५० आगारामध्ये हे कार्यक्रम दिवसभर होतील.
वर्धापन दिनानिमित्त ८६ कर्मचाऱ्यांचा सत्कार विभाग व आगार स्तरावर करण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत शपथ देण्यात येणार आहे, आगरातील वाहक-चालकांना २० टक्के प्रोत्साहन भत्ता, सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)