लसीकरणात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:49+5:302021-05-04T04:15:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एकमेव उपाय असलेल्या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एकमेव उपाय असलेल्या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचा १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ग्रामपंचायतींनी त्या-त्या तालुक्यात ४२ टक्क्यांच्यावर ग्रामस्थांचे लसीकरण केले आहे. ‘लस’च कोरोनाला हरविण्यासाठी रामबाण उपाय असून, नागरिकांनी लस अवश्य घ्यावी व आपले जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. लसीकरण मोहिमेत अन्य ग्रामपंचायतींनी या ग्रामपंचायतींचा आदर्श घ्यावा, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. खासदार सुनील मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व सरपंच यावेळी उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर, मोहाडीमधील वरठी, तुमसरमधील तामसवाडी, लाखनीमधील खराशी, पवनीमधील सावली, साकोलीमधील महालगाव व लाखनी तालुक्यातील पिंपळगाव या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतींनी आपापल्या तालुक्यात लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन करुन तसेच ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेतले आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल व कोरोनापासून सुरक्षितता प्राप्त होईल.
· जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी व इतरांनाही लस घेण्यासाठी सांगावे. लस हेच कोरोनापासूनचे सुरक्षा कवच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घणे गरजेचे असून, सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. लस सुरक्षित असून, त्यापासून कुठलाही धोका नाही. उलटपक्षी आरोग्य व जीवन रक्षाच होणार आहे, ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे त्यांनी सांगितले.