पोळ्याचा सण अन् महागाईचे सावट
By admin | Published: September 12, 2015 12:30 AM2015-09-12T00:30:48+5:302015-09-12T00:30:48+5:30
महागाईचा निर्देशांक वाढल्याने बैलासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी पोळ्यासाठीच्या साहित्य लावणाऱ्यांची ...
बैलांचा पोळा आज : दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांची नाराजी, सणामुळे रविवारचा बैल बाजार शुक्रवारलाच भरला
करडी : महागाईचा निर्देशांक वाढल्याने बैलासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी पोळ्यासाठीच्या साहित्य लावणाऱ्यांची चांगलीच निराशा झाली तर दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा आजपर्यत सरासरी ८५ टक्के इतका पाऊस झाला असला तरी सप्टेंबर महिण्यात पावसाने पुर्णपणे उघाड दिल्याने तसेच खंडित झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती दयनीय आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जवळ पैसाच नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या पाळीव व जीवलग असलेल्या बैलांचा पोळा सण कसा साजरा करावा, याची चिंता सतावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुबलक पाऊसच नसल्याने जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मग त्यांना आंघोळ कशी घालावी, हीसुद्धा चिंता सतावत आहे. खंडित पावसाने शेतातील पिकांची स्थिती नाजूक असून, यावर्षी उत्पन्नात निम्म्याने घट होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने उधारीवर घेतलेला पैसा परत करणे शक्य नसल्याने यावर्षी पोळा सणावर संकट आलेले आहे. साहित्यांच्या दरांमध्ये रेशमी दोर १५० रू.जोडी, गेठे ८० रू.जोडी, म्होरके ८० रू.जोडी, नाथ ५० रू.जोडी, केसारी ४० रू. जोडी, वाकादोर ४० रू.जोडी, सूताचे पेरे १०० रू. जोडी,गोंडे ४५ रू.जोडी, रंगाची डबी ५० ते २०० रूपयांचा समावेश आहे. (वार्ताहर)