‘त्या’ निर्जन स्थळावर होते हुक्का, गांजा पार्टी, तरुण पिढी नशेच्या आहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:58 PM2021-11-10T17:58:28+5:302021-11-10T18:06:57+5:30
अड्याळ आणि परिसरात २० ते ३० च्या वयोगटातील तरुण कधी भरदिवसा, तर कधी रात्रीच्या सुमारास मद्यपान, वाढदिवस तर साजरे करतातच. पण आता एक नवीन धक्कादायक बाब उघडकीस येत आहे ती म्हणजे हुक्का आणि गांजा पार्टी.
विशाल रणदिवे
भंडारा : अड्याळजवळील चार ते पाच किलोमीटर अंतरावर कधी भरदिवसा, तर कधी रात्रीच्या सुमारास युवक मंडळी अशा ठिकाणी मद्यपान तसेच वाढदिवस तर साजरे करतातच. पण आता एक नवीन धक्कादायक बाब उघडकीस येत आहे ती म्हणजे हुक्का आणि गांजा पार्टी.
अड्याळ आणि परिसरात काही निसर्ग रम्य ठिकाण आहेत तर काही शासनाच्या मोडकळीस भकास झालेल्या इमारती, अशा ठिकाणी गेलात तर एकच खळबळ जनक परिस्थिती स्पष्ट दिसून येते. ती म्हणजे तेथील जागेचा होत असलेला गैरवापर. माहितीनुसार गांजा, हुक्का ओढणाऱ्या विशेषतः २० ते ३० च्या वयोगटातील मुलांचे मायबाप सुद्धा चिंताव्यक्त करताना दिसतात, पण काहीच कुठे बोलत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे समोर कुणीही बोलायलाच तयार नाही परंतु यामुळे आता वाम मार्गाच्या आहारी जाण्याचे प्रमाणही हळूहळू का होईना, पण वाढत गेले आहे. यावर वेळीच उपाय नाही केला गेला तर पिढी वाया गेल्याशिवाय राहणार नाही, असेही मत तेच मांडताना दिसतात.
ती युवक मंडळी गांजा, हुक्का ओढतात हे जरी खरे असले तरी तो गांजा गावात मिळतो का? की बाहेरून आणला जातो तो कोण आणतो व विक्री करतो हा संशोधनाचा विषय असला तरी मात्र या युवकांना गांजा, हुक्का मिळण्याची ठाव ठिकाण सर्व काही माहीत असल्याचे बोलले जात आहे.
गावात व परिसरात काही महिन्यांपूर्वी एका गावातील ग्रामस्थांनी गांजा हुक्का पार्टी उद्ध्वस्त केली होती व तेथील अनेक युवकांनी पलायन केले होते नंतर च्या काळात सर्व काही शांततेत पार पडले, पण आता पुन्हा या युवकांनी आपला मोर्चा एकांतवास पाहून वळविल्याची चर्चा आहे.
गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ उघडपणे बोलू शकत नसले तरी त्यांची चिंता ही वस्तुस्थिती आहे याचाही विचार आता संबंधित विभागाला करणे आवश्यक झाले आहे. गांजा हुक्का हे सहजासहजी मिळत नाहीत, परंतु या युवकांचे नेटवर्क एव्हढे जबरदस्त आहे म्हणतात की कुणीही काहीच करत नाही.