कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:05 PM2018-07-15T22:05:48+5:302018-07-15T22:06:13+5:30
वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.
पूर्वीच्या वैनगंगा सहकारी साखर कारखान्यात २६० स्थायी व १५० अस्थायी कामगार कार्यरत होते. कारखाना डबघाईस आल्यावर त्यांचे वेतन थकीत झाले. स्टेट को आॅपरेटीव्ह बँक मुंबई शाखा नागपूर यांनी या कारखान्याला टाळे लावून नंतर विक्रीस काढले. कारखाना विक्री करताना बँकेने कामगारांचे थकीत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयात मान्य केले होते. मात्र अल्प मोबदला देत असल्याने कामगार औद्योगिक न्यायालयात गेले. औद्योगिक न्यायालयाने कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन देण्याचा निकाल दिला. त्यामुळे बँकेने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निकाल देत बँकेला १३ कोटी ८९ लक्ष ८४ हजार ३३४ रुपये कामगारांना देण्याचा आदेश ३० आॅक्टोबर २०१५ रोजी दिला होता. मात्र स्टेट को आॅपरेटीव्ह बँक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपीलात गेली. बँकेला असे वाटले की साधारण कामगार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार नाहीत, पण कामगार संघटनेकडून अॅड.सत्यजीत देसाई, अॅड.प्रकाश मेघे व लक्ष्मी मलेवार यांनी बाजू मांडण्याचे मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात टेबल क्रमांक ११० वर प्रकरण क्रमांक ४३१४९/२००५ हे सुनावणीसाठी घेण्यात आले असून या प्रकरणावर सुनावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असल्याने व निकाल कामगारांच्याच बाजूने लागेल, अशी माहिती वकीलांनी दिल्याने कामगारात आनंदाचे वातावरण आहे.
कारखान्याचे व बँकेशी हितगुज असलेले काही कर्मचारी व कामगार खोट्या बातम्या पसरवित असून कामगारांना तडजोड करण्यास सांगत आहेत. कामगारांना त्यांच्या घामाचा पूर्ण मोबदला मिळणार असून कामगारांनी खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये तसेच न्यायालयाच्या खर्चासाठी लागणारी वर्गणी मजदूर संघाच्या पदाधिकाºयांकडेच जमा करावी असे आवाहन करण्यात आले.
मोहाडी येथे आयोजित पत्रपरिषदेला भोजराम पारधी, टी.आर. गायधने, रामदास साठवणे, पी.एफ. बावनकर, कृष्णराव बारापात्रे, मनोहर गायधने, एस.पी. सव्वालाखे, अरुण हुड, मधुसूदन पाहुणे, राजू कारेमोरे, आर.व्ही. बांते, पी.सी. गौतम, शिवशंकर पेठेकर, गोलकुदास हेडाऊ, मनोहर पटले, झिबल लाळे, दयाराम नखाते, धनराज काटेखाये, संजय भवसागर, सुभाष यादव उपस्थित होते.