भोंडेकरांच्या मंत्रिपदाची आशा बळावली ; भंडारा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:26 PM2024-11-25T13:26:08+5:302024-11-25T13:26:58+5:30
Bhandara Assembly Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्र्यांनी पवनीतील सभेत दिले होते संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा दमदार विजय मिळवून विधानसभेत पोहोचलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मंत्रिपदाची आशा बळावली आहे. त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही असून आता त्यासाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
शनिवारी निकाल लागल्यानंतर सायंकाळी निघालेली विजयी रॅली आणि रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार सुरू होता. मुख्यमंत्री आणि पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी तातडीने पक्षाची बैठक बोलाविल्याने ते रविवारी सकाळीच ७ वाजता नागपूरहून विमानाने मुंबईकडे रवाना झाले. एक- दोन दिवसात नवीन सरकार स्थापन होणार असून त्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात भोंडेकर यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांना पक्षाचे उपनेतेपद मिळाल्याने त्यांचे पक्षात महत्त्व वाढले आहे. विदर्भात पक्षाला शक्ती मिळावी यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विजयी झालेले तिन्ही आमदार मुंबईत पोहोचले आहेत. नाना पटोले दोन दिवसांपासूनच मुंबईत पक्षीय कामात व्यस्त आहेत. तुमसरचे नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे हेसुद्धा शनिवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले.
भोंडेकरांनाही अपेक्षा
आपल्या मंत्रिपदाची खुद्द नरेंद्र भोंडेकर यांनाही अपेक्षा आहे. पवनीतील सभेत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने ते निश्चित आहेत. स्थानिक पालकमंत्री असावा, हा त्यांचा सूर आजही कायम आहे. जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या जलद विकासासाठी ही गरज असल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे