रुग्णालयात रुग्णांचे हाल

By admin | Published: October 14, 2015 12:44 AM2015-10-14T00:44:04+5:302015-10-14T00:44:04+5:30

पवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले.

Hospital patients' condition | रुग्णालयात रुग्णांचे हाल

रुग्णालयात रुग्णांचे हाल

Next

रिक्त पदांचा घोळ कायम : स्कॅन मशीन धूळ खात, अड्याळ येथील प्रकार
विशाल रणदिवे अड्याळ
पवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले. यासाठी एक कोटी रुपये खर्च करुन सुसज्ज व देखणी ईमारत बांधण्यात आली. परंतु सद्यस्थितीला रिक्त पदांचा घोळ व सुविधांच्या अभावामुळे या रूग्णालयात रूग्णांचे हाल होत आहेत.
रूग्णालयाची इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर रुग्णालय सुरु नाही होत म्हणून येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले होते. एकंदरीत उद्घाटनापासून ते आजपावेतो या रुग्णालयात एक ना अनेक समस्या कायम आहेत. या रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधींचेही तेवढेच दुर्लक्ष होत गेले. ज्या आनंदी वातावरणात ज्या हेतूने मोठ्या वास्तुचे उद्घाटन झाले तो हेतू पूर्ण झालेला दिसून येत नाही. शासनाच्या दृष्टीकोनानुसार या ग्रामीण रुगणालयाची स्थापना झाली खरी परंतु याचा लाभ रूग्णांना कमीच मिळत आहे. काही कर्मचारी रुग्णावर तर काही रुग्ण येथील कर्मचाऱ्यांवर चिडताना दिसतात. कारण एकमेव असते येथील असुविधा. भर उन्हाळ्यात एका रुग्णाचे स्वत:घरचा कुलर लावला होता. रुग्णाना यात कधी पाणी नाही तर कधी घाणीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
अडयाळ व परिसरातून रोज शेकडो रुग्ण या ग्रामीण रुग्णालयाची पायरी चढतात. मात्र रुग्णालयच आजारी असेल तर रुग्णांना काय लाभ होणार? शवविच्छेदन वेळेवर होत नाही. त्यासाठी बाहेरुन स्विपरला पाचारण करावे लागते. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असणार. सोनोग्राफीची नवीन मशीन २०१२ पासुन धूळ खात पडली आहे. आॅपरेटर नसल्याने त्याचा उद्घाटनाचा मुहूर्त अद्यापही गवसलेला नाही. या ग्रामीण रूग्णालयात एनसीडी योजनेअंतर्गत असंसर्गजन्य रोग उपचारार्थ ६ पदे मंजुर असून एकाच्या भरवश्यावर काम केल्या जात आहे. भंडारा येथील सामान्य रुग्णालयात अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील २ कर्मचारी काम करताना आढळतात. पोष्टींग अड्याळला आणि वर्कींग भंडारा असे चित्र सध्या पाहावयास मिळते. लोकप्रतिनिधी येतात समस्या लवकर सुटतील, एवढे दोन शब्द बोलून निघून जातात. परंतु समस्या ‘जैसे थे’ असे चित्र आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि वाढत्या रुग्णांमुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना तर त्रास होतोच पंरतु त्यापेक्षा सर्वात जास्त त्रास इथे येणाऱ्या रुगणांना होताना दिसतो. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

Web Title: Hospital patients' condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.