रुग्णालयाची वसाहत भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:17 PM2017-12-16T23:17:48+5:302017-12-16T23:18:15+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.मात्र संबंधित विभागाला अद्यापही हस्तांतरण झालेली नाही.येथे सध्या वन्यप्राणी, किड्यांनी जागा धरली असून उकिरडे निघत आहे.खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. याची कल्पना लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्या आहेत. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
नवनवीन कामातून टक्केवारी मिळते म्हणून नवीन बांधकामाकडे कंत्राटदार मोर्चा वाढविताना दिसतात. त्यामुळे ही इमारत भग्नावस्थेत आली आहे. २० लाख रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीला व आरोग्य अधिकारी कर्मचाºयांसाठी सोय व्हावी म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च केले.मात्र कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन भूमिकेमुळे शासनावर अधिकचा भर दिवसेंदिवस पडत आहे. त्यामुळे याकडे कुणीतरी लक्ष देईल का?असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. लाखांदूर तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे या तालुक्याला येणारा निधी, योजना या सर्वांच्या शेवटी येत असतात. लाखांदूर येथील आरोग्य विभागाच्या अनेक समस्या आहेत.मात्र याकडे लोकप्रतिनिधी डोळेझाक करून भावनिक समजूत घालून आपलेच काम काढून घेण्यात मश्गुल असतात. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीसाठी लाखांदूर-साकोली महामार्गावर जागा मुकरार करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मागील १५ वर्षापुर्वी २० लाख रुपये खर्च करून इमारत बांधकाम केले. रंगरंगोटी केली. विद्युत पुरवठाही सुरू केला होता. त्यावेळी कंत्राटदारांची माशी कुठे शिंकली कुणाशी माहीत त्या इमारतीचे हस्तांतरण होऊ शकले नाही. त्यामुळे ती इमारत भग्नावस्थेत उभी असुन खाली जागेत काही नागरीक अतिक्रमण करीत आहेत. काही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता 'अपडाऊन'करतात तर, काही कर्मचारी लाखांदुरात राहतात. अर्ध्याअधिक जागा रिक्त असल्याने काही कर्मचाºयांवर अधिकचा ताणही पडत आहे. मात्र ना जागा भरायची, ना वसाहत इमारत हस्तांतरण करायची असा पवित्रा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य सेवेसाठी जनता तर, सुस्थितीतील वसाहतीत राहण्यासाठी कर्मचारी चातकासारखी प्रतिक्षा करीत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बांधकाम पूर्णत्वासाठी १५ लाखांची गरज
ग्रामीण रुग्णालयाची वसाहत इमारत पूर्णत्वास नेण्याकरिता १५ लाख रुपयांची गरज आहे. एखाद्या तरी लोकप्रतिनिधीने आपल्या निधीतून खर्ची घालून तालुकावासीयांसाठी व अधिकाºयांसाठी बांधकामासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.