रुग्णालयातील जलकुंभात जंत अन् शेवाळ
By Admin | Published: March 25, 2017 12:25 AM2017-03-25T00:25:49+5:302017-03-25T00:25:49+5:30
मोहाडी ग्रामीण रूग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याने या टाक्यात शेवाळ तयार झाले आहे.
मोहाडी ग्रामीण रूग्णालयातील प्रकार : अनेक वर्षांपासून सफाईअभावी रुग्णांचे आरोग्य धोक्यात
सिराज शेख मोहाडी
मोहाडी ग्रामीण रूग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याने या टाक्यात शेवाळ तयार झाले आहे. डासांच्या अळ्यासुध्दा तयार झाल्या आहेत. ज्यामुळे या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यामुळे रूग्णांना संसर्गाचा सुध्दा धोका उत्पन्न झाला आहे.
ग्रामीण रूग्णालयात इमारतीवर सात ते आठ पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी चार टाक्या सिन्टेक्सच्या आहेत व उर्वरित सिमेंट क्राँक्रीटच्या तयार करण्यात आल्या आहेत. या आठ पाण्याच्या टाक्यापैकी दोन ते तीन पाण्याच्या टाक्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात तर दोन टाक्या वॉर्ड व शस्त्रक्रिया गृहाच्या कामासाठी वापरण्यात येतात. उर्वरित पाण्याच्या टाक्यातील पाणी प्रसाधन गृहाच्या वापरासाठी उपयोगात आणला जातो. सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या स्लॅबचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे रुग्णालय समिती सदस्य अजय गायधने, पं.स. सभापती हरिशचंद्र बंधाटे यांनी सहजच पाण्याच्या टाकीत डोकावुन बघितले असता त्यांना त्या टाकीत डासांच्या अळ्या व शेवाळ दृष्टीस पडले तसेच तळाला मातीचा गाट बसलेला दिसला. याची सुचना आमदार चरण वाघमारे यांना दिली. त्यानंतर जिल्हा आरोगय प्रयोगशाळेचे अधिकारी येथे पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी सोबत नेले. रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाकीत जंतु व शेवाळ तयार होणे ही गंभीर आहे. या रुग्णालयात रुग्ण आरोग्य सुधारण्यासाठी येतात मात्र येथील अशुध्द पाण्यामुळे त्यांना नानाविध आजार होण्याचीच शक्यता जास्त आहे. शस्त्रक्रिया गृहात तसेच प्रसुती कक्षात निर्जंतुक पाणी असणे गरजेचे असतांना याच जंतुयुक्त पाण्याचा वापर आजपर्यंत करण्यात येत आहे.
पाण्याच्या टाक्यामध्ये डासांच्या अळ्या चालताना दिसल्या. काठावर हिरवे शेवाळ लागलेले होते. हाच पाणी या रुग्णालयात येणार रुग्ण व त्यांचे नातेवाईक पितात. नागरिकांच्या जिवनाशी हा खेळ अनेक दिवसांपासुन सुरु आहे. दोषी डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी.
-हरिशचंद्र बंधाटे, सभापती मोहाडी
पाण्याच्या टाक्या नेहमी साफ होत असतात. दर महिन्याला गावातील पाण्याची तसेच रुग्णालयातील पाण्याची तपासणी प्रयोगशाळेतुन करण्यात येत आहे. वादळामुळे टाक्यावरील झाकन उडाले असतील. आजच त्यावर झाकन बसविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
डॉ. हंसराज हेडाऊ
वैद्यकिय अधीक्षक,मोहाडी