हॉटेल बंदीने महिलांची भाजी-भाकरी करणे नव्हे रोजीरोटीही थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:52+5:302021-04-10T04:34:52+5:30
भंडारा : राज्य शासनाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय ...
भंडारा : राज्य शासनाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय तसेच खानावळींमध्ये पोळी, भाकरी अथवा भांडी धुणाऱ्या महिलांचा रोजगारही आता थांबला आहे. त्यामुळे आता शहरातच नव्हे तर जिल्हाभरातील हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या महिलांसह त्यांच्या कुटुंबियांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे सरकारने हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद करू नये, त्यासाठी ठराविक वेळ दिला तरी हरकत नाही, असा सूर या चपाती, भाकरी करणाऱ्या महिलांमधून उमटत आहेत.
भंडारा शहरासह संपूर्ण जिल्हाभरात २४८ लहान-मोठी अनेक हॉटेल आहेत. तर या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या तब्बल १,३४० इतकी आहे. त्यामुळे या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे पुन्हा जर लॉकडाऊन झाले तर आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न या महिला विचारू लागल्या आहेत. यामध्ये अनेक महिला गरीब कुटुंबातील तर काही विधवा आहेत. काहींचे पती हे व्यसनाधिन असल्याने कुटुंबाची जबाबदारी ही त्या कुटुंबप्रमुख महिलेवर आहे. त्यामुळे जवळपास दीड हजार कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरातील लहान-मोठी हॉटेल तसेच अनेक खानावळींमध्ये या महिला भाजी-भाकरीसोबतच धुणीभांडी करत होत्या. यातूनच त्यांना रोजगार मिळत होता. आजही अनेक हॉटेलमध्ये महिलांनी बनवलेल्या रोटी अथवा चपातीची सर पुरुषाच्या हातच्या चपातीला येत नाही. त्यामुळे आजही अनेक हॉटेलमध्ये दोन-तीन महिला या चपाती भाकरी करण्यासाठी आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा विचार केल्यास दोन्ही जिल्ह्यांत मिळून ४४८ हॉटेल आहेत तर या दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास अडीच ते तीन हजार महिला या हॉटेल व्यवसायावर अवलंबून असून, त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
गेले वर्ष आम्ही कसे काढले आमचे आम्हालाच माहीत
राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग वाढल्याने अनेकांचा हॉटेल व्यवसाय संकटात आला असून, अनेकांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्याही रोडावली असल्याने हॉटेल व्यवसाय पूर्णत: कोलमडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हॉटेलमध्ये काम मिळणार नसल्याने भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांना आता पुन्हा नवीन कामाच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही रोजगार देण्यास तयार नाही, असे चित्र दिसत आहे.
कोट
हॉटेल बंद झाल्यास अनेकांच्या खाण्या-पिण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोरोना परिस्थितीमुळे आजकाल मदत करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हॉटेल व्यवसाय सरकारने सुरुच ठेवल्यास नवीन ठिकाणी गेलेल्यांना जेवणची सोय होते.
हॉटेल व्यवसायिक.
कोट
मी एका खानावळीमध्ये काम करते. येथे चपाती-भाजी बनवण्याचे काम माझ्याकडे आहे. यातून मला रोजगार मिळतो. शिवाय महिलांच्या स्वयंपाकाची सर पुरुषांच्या हाताला येत नसल्याचेही अनेक ग्राहक आवर्जून सांगतात. मात्र, आता पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे.
- लचिमाबाई ठाकरे, महिला
कोट
हॉटेल बंद झाल्याने माझा हक्काचा रोजगार गेला आहे. आम्ही तीन महिला एकत्र येऊन भाकरी, चपाती बनवून हॉटेलमध्ये पुरवत होतो. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची संख्या कमी झाल्याने आमच्याकडून चपाती, पोळीची मागणी होत नाही. त्यामुळे आम्ही आता करायचे तरी काय, असा प्रश्न आहे. सरकारने आम्हाला मदत करायला हवी.
- भावना गवळी, भंडारा