Bhandara | मध्यरात्री कोसळले घर, आजी-नातू जखमी; कुटुंब उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 11:57 AM2022-10-15T11:57:27+5:302022-10-15T11:59:55+5:30
सततच्या पावसाचा फटका, पालांदूरची घटना
पालांदूर (भंडारा) : सततच्या पावसाने खिळखिळे झालेले घर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळून आजी-नातू जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे गुरुवारी घडली. दोघांनाही पालांदूर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
गीता यशवंत शहारे (४९), आरोह शहारे (६, दोघे रा. पालांदूर) असे जखमीचे नाव आहे. महिनाभरापासून पाऊस कोसळत असल्याने अनेक घरांना फटका बसला आहे. गीता शहारे यांचे घरसुद्धा पावसाने खिळखिळे झाले होते. गुरुवार रात्री घरातील सर्व मंडळी झोपी गेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झोपडीवजा घर कोसळले. त्यात गीत शहारे आणि नातू दबला गेला.
शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ पालांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घर कोसळल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाला घरकुल मंजूर करावे, अशी मागणी दामाजी खंडाईत यांनी केली आहे.