देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 12:53 PM2022-04-23T12:53:43+5:302022-04-23T13:00:56+5:30
घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. त्यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या.
लाखांदूर (भंडारा) : देवघरातील दिव्याची वात उंदराने पळविल्याने घराला आग लागून ७० हजाराचे संसारोपयोगी साहित्य बेचिराच झाल्याची घटना गुरुवारी रात्री तालुक्यातील मांडळ येथे घडली. आगीमुळे संसार उघड्यावर आला आहे.
मांढळ येथील तुळशीराम पिलारे (६५) यांच्या घरची मंडळी गुरुवारी लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. त्यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या. दरम्यान घराला अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या कवेत आले.
गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील अन्नधान्य व इतर संसारोपयोगी साहित्याची चक्क राखरांगोळी झाली. यात ७० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती आहे. देवघरातील दिव्याची वात उंदराने पळविली आणि ती वात घरातील कपड्यांवर पडून आग लागल्याची माहिती देण्यात आली. या आगीची माहिती लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांना होताच तलाठ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
मदतीची अपेक्षा
आग लागलेल्या तुळशीराम पिल्लारे यांच्या घराचा प्रशासनाने पंचानामा केला आहे. मात्र, त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी मांढळ येथील गावकऱ्यांनी केली आहे.