गोडावून हाऊसफुल्ल, शेतकऱ्यांना धान विक्रीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:40+5:302021-03-04T05:07:40+5:30
शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीला घेऊन जातात. तेव्हा शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर तुमच्या सात-बाराची आधीच्या केंद्रावर ...
शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीला घेऊन जातात. तेव्हा शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर तुमच्या सात-बाराची आधीच्या केंद्रावर नोंदणी झाली असून, नवीन केंद्रावर धान मोजले जाणार नाही, अशी माहिती देतात. त्यामुळे शेतकरी धान घेऊन घरी परत येत आहे. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार येथील अनेक शेतकऱ्यांचे धान घरीच पडून आहेत. धान खरेदी करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने शेतकऱ्याच्या धानाची उचल झाली नाही, तर शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना धान विक्री करावी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तुमसर तालुक्यातील देवसर्रा आधारभूत धान खरेदी केंद्रावर गोडावून हाऊसफुल्ल झाल्याने धान खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. गुरुवारी येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली. गोडावूनसुद्धा रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित धान खरेदी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून, येथे धानाची विक्रमी उत्पादन होते. त्यामुळे धान खरेदी केंद्राचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही धान असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर सहज विक्री करता यावे, असे नियोजन करण्याची गरज आहे. शासनाने यावर्षी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे वाढविली आहेत. परंतु प्रत्येक धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री झाल्याचे दिसून येते. अजूनही शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे, असे सांगण्यात येते.
नवीन आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान घेतले गेले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
धान खरेदी केंद्र कुठेही बंद नाही. गोडावून हाऊसफुल्ल नाहीत. नवीन धान खरेदी केंद्रांना जुन्या धान केंद्र खरेदी केंद्राची काही गावे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धान केंद्राच्या गावात बदल झाला आहे.
गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा