गृहिणी ते जि.प. अध्यक्षपदापर्यंत प्रवास
By admin | Published: July 18, 2015 12:34 AM2015-07-18T00:34:27+5:302015-07-18T00:34:27+5:30
देशात व राज्यात भाजपची लहर असताना भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चमत्कार घडवून आणला.
अंबर दिवा मुरमाडीत : गिलोरकर म्हणाल्या, आता सर्व वेळ जनतेसाठी!
चंदन मोटघरे लाखनी
देशात व राज्यात भाजपची लहर असताना भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चमत्कार घडवून आणला. कधी स्वप्नातही आपण राज्यमंत्री दर्जा असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनू असे ध्यानीमनी नसताना एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा आता भाग्यश्री गिलोरकर यांचा प्रवास सुरू झाला आहे. गिलोरकर यांच्या रुपाने मुरमाडीला अध्यक्षपद मिळाल्यामुळे गावात उत्साह आहे.
भाग्यश्री गिलोरकर या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील आमगाव जवळच्या नवीन लाडज येथील शेषराव भोयर यांची द्वितीय कन्या आहेत. मुरमाडी (तुपकर) येथील रहिवाशी भाऊराव गिलोरकर यांच्याशी त्यांचा ४ आॅगस्ट १९९९ रोजी विवाह झाला. अवघ्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या गंगासागर भोयर यांचे सासरी ‘भाग्यश्री’ हे नाव ठेवण्यात आले. मुलगा शंतनु हा आठवीत तर मुलगी कल्याणी ही दहावीत शिकत आहे. स्वस्त धान्य दुकान व विटा व्यवसायावर गिलोरकर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालायचा. हा व्यवसाय आजही सुरूच आहे. भाऊराव हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असून १० वर्षांपूर्वी मुरमाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे गिलोरकर दाम्पत्यांचा घराघरांत व्यापक जनसंपर्क आहे. या व्यापक जनसंपर्काच्या बळावर काँग्रेसचे नेते सेवक वाघाये यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध बडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या लढाईत त्या विजयी झाल्या. अध्यक्ष बनल्यानंतर सदर प्रतिनिधीने मुरमाडी येथे त्यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, उच्चशिक्षित नसलो तरी सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. गरीब व वंचित महिलांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवून त्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.